कालचा गोंधळ बरा होता!

0

मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आणि गोंधळ यांचे अतुट नाते जमले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधीच पदाधिकार्‍यांच्या भ्रष्ट काराभारवरून बीसीसीआयची लक्तरे वेशीवर मांडली होती. त्यात आयपीएल, संघ निवड, क्रिकेटपटूंना देण्यात येणार्‍या मानधनाच्या कराराचा मुद्दा असे निरनिराळ्या गोंधळाचे विषय असतात. पण मागील शनिवारपासून मुख्य प्रशिक्षकाच्या नेमणुकीवरून जो काही तमाशा मांडला गेला त्यावरून कालचा गोंधळ बरा होता, असे म्हणायची वेळ आली आहे. शेवटी सर्वोच्च न्यायलयाकडून दट्या मिळेल म्हणून मंगळवारी हो नाही च्या नाट्यमय घडामोडीनंतर रात्री उशीराने रवी शास्त्री, झहीर खान, राहुल द्रविड, संजय बांगर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लोढा समितीने केलेल्या शिफारशींमुळे बीसीसीआयवर सर्वोच्च न्यायालयाचा आसूड ओढला जात आहे. त्यामुळे बीसीसीआयची अवस्था नाजूक झाली आहे. बीसीसीआयचे कामकाज पाहणार्‍या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी सौरव गांगुली, व्ही.व्ही. एस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर या दिग्गजांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीवर ही जबाबदारी सोपवली होती. या समितीला मंगळवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे घाईघाईत 2019 पर्यंतच्या विश्‍वचषक स्पर्धेपर्यंत रवी शास्त्री यांची नेमणूक झाल्याचे जाहीर झाले. पण त्यानंतर काही तासांमध्येच बीसीसीआयाचे सचिव अमिताभ चौधरी यांनी पार्टी करण्याच्या मूडमध्ये असलेल्या रवी शास्त्रींचा हिरामोड केला. क्रिकेट सल्लागार समितीने अजून प्रशिक्षक नेमलेला नाही एवढेच चौधरी यांचे म्हणणे होते. पण या गोष्टीत बीसीसीआयच्या धुरिणींनी नाट्यमयरित्या हस्तक्षेप करत शास्त्री यांच्या नावावर सहमती दाखवली. पण या सगळ्या घटनाक्रमांचा अर्थ काय काढायचा हा प्रश्‍न येतोच. शास्त्रींच्या जोडीने झहीर खानचे नाव गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून जोडले गेले. पण त्यावरून अजून मानापमान सुरूच आहे.

अपमानास्पद परिस्थीतीतून अनिल कुंबळेने प्रशिक्षकपद सोडल्यावर भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची शोध मोहिम सुरू झाली. भारतीय संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक हे एखादा अपवाद वगळता कधी एकत्र आलेले नाहीत हा इतिहास आहे. प्रशिक्षक कोणीही असो, देशी किंवा परदेशी पण तो कर्णधाराच्या गळ्यातला ताईत झालाय असे फारसे कधी भारतीय संघात घडलेले नाही. 1992 ते 2017 या कालखंडात भारतीय संघासाठी 11 प्रशिक्षक होऊन गेले पण फार कमी प्रशिक्षकांना कर्णधाराशी जुळवून घेता आले. भारतीय क्रिकेटमधील सगळ्यात जास्त विवादास्पद राहिलेले प्रशिक्षक म्हणजे ग्रेग चॅपेल. ग्रेग चॅपेल आणि त्यावेळचा भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली यांच्यातील वादाचे किस्से तर आजही चर्चेत रंग भरतात. चॅपेल यांचा कार्यकाळ 2005 ते 2007 असा होता. विशेष म्हणजे बीसीसीआयचे तत्कालीन सर्वेसर्वा जगमोहन दालमिया यांनी गांगुलीच्याच सांगण्यावरून चॅपेल यांची नियुक्ती केली होती. पण नंतरच्या काळात चॅपेल यांनीच सौरव गांगुलीवर डोळे वटारायला सुरुवात केली होती. चॅपेल यांच्या कार्यपद्धतीबाबत संघातील तेंडुलकरपासून सगळ्यांचाच आक्षेप होता. चॅपेल यांनी भारतीय क्रिकेटपटूंच्या नैसर्गिक खेळाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना त्यांची भुमिका नेहमीच छडी लागे छमछम अशी होती. त्यामुळे चॅपेल यांची गच्छंती सगळ्यांना हवीहवीशी होती.

ग्रेग चॅपेल यांची हकालपट्टी म्हणा किंवा त्यांचा करार संपुष्टात आल्यावर गॅरी कर्स्टन भारतीय संघाचे गुरुजी झाले. हे गुरुजी आणि आधीचे चॅपेल गुरुजी यांच्या कार्यशैलीत जमीन अस्मानाचा फरक भारतीय खेळाडुंनी अनुभवला. चॅपेल यांनी खेळाडूंना मी सांगतो त्याप्रमाणे झालेच पाहिजे अशी भूमिका घेतली होती. कर्स्टन यांचाही तसाच दृष्टीकोण असायचा. पण त्यांची सांगण्याची पद्धत वेगळी होती. कर्स्टन यांनी खेळाडूंकडून फिटनेस, सराव करून घेताना त्यांच्यावर कसली जबरदस्ती केली नाही. ना त्यांनी खेळाडूंच्या खेळण्याच्या नैसर्गिक शैलीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खेळाडूंच्या चुका दाखवून देताना त्यांच्यावर संघासाठी किती मोठी जबाबदारी आहे याची जाणिव करून दिली. खेळाडूंशी जवळीक वाढावी याकरता कर्स्टन त्यांच्या घरगुती कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले. कर्स्टन यांच्या या कार्यपद्धतीचा फायदा भारतीय संघाला मिळाला. 1983 मध्ये कपिल देवने भारताला तेव्हाचा प्रुडेंशियल विश्‍वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर 28 वर्षानंतर 2011 मध्ये भारताने मुंबईत आयसीसी विश्‍वचषक जिंकला. भारताच्या या यशाचे खूपसे श्रेय कर्स्टन यानांही जाते. कर्स्टन 2008 ते 2011 दरम्यान भारतीय संघासोबत होते.

कर्स्टन घरी गेल्यावर झिम्बाबवेत जन्मलेल्या डंकन फ्लेचर यांना प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले. त्यावेळी अशी चर्चा होती की फ्लेचर यांना देण्यात आलेले मानधन बीसीसीआयने कुठल्याच प्रशिक्षकाला दिले नव्हते. सुरुवातीला फ्लेचर यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. त्यानंतर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. पण या दरम्यान अशी एक वेळ आली की तुम्ही आताच जा असे बीसीसीआयला फ्लेचर यांना सांगावे लागले. जवळजवळ बीसीसीआयने फ्लेचर यांची हकालपट्टी केली होती. फ्लेचर यांच्याकडून मिळालेल्या अनुभवातून धडा घेत यापुढे परदेशी प्रशिक्षक नेमायचा नाही असा अलिखित नियमच बीसीसीआयने तयार केला.

बीसीसीआयने 2015 मध्ये रवी शास्त्री यांना संघाचे प्रशिक्षक न नेमता संघाचे संचालक म्हणून नियुक्त केले. त्यानंतर त्यांनी 20 जून 2016 मध्ये अनिल कुंबळेला प्रशिक्षक केले. पण ज्यापद्धतीने आणि परिस्थितीत कुंबळेने पद सोडण्याचा निर्णय घेतला तशी वेळ भारताच्या इतर प्रशिक्षकांवर आली नव्हती. आता पुन्हा एकदा चेंडू रवी शास्त्री यांच्या कोर्टात पडला आहे. शास्त्री यांच्या कार्यकाळात भारताने यश मिळवल्याचे मोठ्या आवेशात सांगितले जाते. पण हे यश परदेशात नाही देशातील संथ किंवा मंद म्हणता येतील अशा खेळपट्ट्यांवर मिळवलेले होते. त्यांच्या आधीच्या कार्यकाळात भारताने दक्षिण आफ्रिकेला मायदेशात हरवले. भारताच्या त्या विजयाची चांगल्या शब्दांमध्ये कधीच चर्चा झाली नाही. किंबहुना भारताने दक्षिण आफ्रिकेला फसवून हरवल्याचे बोलले जाते. यापुढे भारत आता परदेशातच खेळणार आहे. पुढील आठवड्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौर्‍यावर जाईल. तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी-20 सामना भारतीय संघाची परीक्षा बघणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इतर संघही आहेतच.

कोहलीचे फेव्हरिट असल्यामुळे 55 वर्षीय रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले आहेत हे लपून राहिलेले नाही. रवी शास्त्री आल्यामुळे आता भारतीय खेळाडूंना भरपूर स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे खेळाडू परदेशात कुठेही जाऊ शकतील. पाहिजे ती मजा करू शकतील. कोणाला बरोबर घेऊन जायचे असेल तर तेही त्यांना करता येणार आहे. एकूण काय रवी शास्त्री यांची विचारसरणी किंवा मानसिकताच अशी आहे की, स्वत: मजा करा आणि दुसर्‍यालाही करू द्या.
विशाल मोरेकर