कालच्या भेटीबद्दल मनोहर पर्रीकरांनी राहुल गांधींना लिहिले हे खुले पत्र !

0

पणजी- काल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. मात्र या भेटीदरम्यान पर्रीकर यांनी ‘माझा राफेलशी काहीही संबंध नव्हता, किंबहुना या कराराची माहितीदेखील नव्हती’ असे सांगितल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधींनी केला होता. या वृत्ताचा दाखला देत गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राहुल गांधी यांना खुले पत्र लिहित टीका केली आहे.

‘आपण फक्त ५ मिनिटे भेटलो, त्या भेटीचा वापरही तुम्ही क्षुल्लक राजकारणासाठी करत आहात, या पाच मिनिटांच्या भेटीत एकदाही राफेल करारावर चर्चा झाली नाही,’ असे स्पष्टीकरण पर्रिकर यांनी दिले आहे.

संबंधित बातमी-पर्रीकर म्हणाले अंबानींसाठी मोदींनी खेळ केला; कालच्या भेटीनंतर राहुल गांधींचा दावा 

राहुल गांधी यांच्या या विधानावर पर्रिकर यांनी त्यांनाच पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. पर्रिकर म्हणतात, तुम्ही मंगळवारी कोणतीही पूर्वसूचना न देता माझी भेट घेण्यासाठी आलात. माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. भारतीय राजकारणामध्ये पक्षातील भेद बाजुला ठेवत प्रतिस्पर्ध्यांना चांगलं आरोग्य चिंतण्याची परंपरा आहे. तुमच्या या कृतीचे मी स्वागत करतो. पण प्रसारमाध्यमांमध्ये आलेली तुमची वक्तव्ये बघून मला धक्काच बसला. या वृत्तांनुसार तुम्ही माझा दाखला देत काही विधाने केलीत. मला राफेल कराराविषयी माहिती नव्हती, असे पर्रिकरांनी सांगितल्याचे तुम्ही म्हणालात. पण आपली भेट फक्त पाच मिनिटे झाली, या भेटीत आपल्यात राफेल करारावर चर्चा देखील झाली नाही, असे पर्रिकरांनी सांगितले.