मुंबई-मुंबईत काल संध्याकाळपासून सुरु झालेली पावसाची संततधार अद्यापही कायम आहे. शहर आणि उपनगरात अधून-मधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. चेंबूर, कुर्ला, वांद्रे, खार, विलेपार्ले, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, दहीसर, बोरीवली, सायन, ठाणे, डोंबिवली या भागात जोरदार पाऊस झाला आहे. एसव्ही रोड, खार सबवे या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हिंदमात परिसरात दरवर्षी पाणी साचते. यावेळी पालिकेने तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवले आहेत. त्यामुळे तिथे पाणी साचलेले नाही. मुंबईच्या तिन्ही मार्गावर लोकल सेवा सुरळीत सुरु आहे फक्त मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकल काही मिनिट उशिराने धावत आहे.
पहाटे पाचवाजेपर्यंत सांताक्रूझमध्ये ९६.६ मिमि पावसाची नोंद झाली आहे. मागच्या सोमवारीही मुंबईत जोरदार पाऊस कोसळल्यामुळे रस्ते, रेल्वे वाहूतक विस्कळीत झाली होती. हवामान विभागाने या आठवड्यात संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून काही ठिकाणी तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, तामिळनाडू, आसाम, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये काही अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.