कालवाबाधितांचे होणार पुनर्वसन

0

त्याच परिसरात ‘एसआरए’मध्ये घरे देण्याचा निर्णय

पुणे : मुठा उजवा कालवा दुर्घटनेत पूर्णत: बाधित 98 कुटुंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतंर्गत (एसआरए) त्याच परिसरात ताब्यात असलेल्या सदनिकांमध्ये टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पात्र आणि अपात्रची यादी तपासणे, याच परिसरात एसआरएच्या ताब्यात असलेल्या, येत्या दोन ते तीन महिन्यांच्या काळात ताब्यात देणार्‍या सदनिकांची माहिती सादर करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रधिकरणाला दिले आहेत. दुर्घटनेनंतर महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या मदतीने विविध कामे हाती घेतली आहेत. त्याचा आढावा सोमवारी पालकमंत्र्यांनी घेतला. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

बापट म्हणाले, पूर्णत: बाधित कुटुंबांचे एसआरएच्या माध्यमातून पुनर्वसन होणार आहे. राजेंद्रनगर परिसरात 25 सदनिका आहेत. त्या ठिकाणी पहिल्या टप्यात काहींचे पुनर्वसन होणार आहे. त्या परिसरात अन्य काही योजना सुरू आहेत. त्यातून किती सदनिका उपलब्ध होणार आहेत. याची माहिती घेण्याच्या तसेच पुनर्वसन करताना पात्र, अपात्रांची यादी तयार करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत. तर अंशत: बाधितांना पालिकेच्या ताब्यातील सदनिका भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.