759 कुटुंबांना 43 लाख 35,000 रुपयांचा निधी मंजूर
पुणे : मुठा उजवा कालवा फुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी महापालिकेस तब्बल दोन महिन्यांनंतर वेळ मिळाला आहे. त्यानुसार पूर्णतः बाधित 90 कुटुंबांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये आणि अंशतः बाधित 669 कुटुंबांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मदत करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही रक्कम या नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाणार आहे. महापालिकेने मंजूर केलेल्या मदतीवर, पूर्णतः बाधितांसाठी 9 लाख 90,000 रुपये आणि अंशतः बाधितांसाठी 33 लाख 45,000 रुपयांची मदत करण्यात येणार आहे. एकूण 759 कुटुंबांना 43 लाख 35,000 रुपये दिले जाणार आहेत.
कालवा फुटून कासम प्लॉट येथील झोपडपट्टी वस्तीमध्ये पाणी वाहात होते. पिांण्याच्या प्रवाहाने काही झोपड्या पडल्या होत्या. अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू, भांडी, टीव्ही, फ्रीज, गॅस सिलिंडर, कपडे, शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य, महत्त्वाची कागदपत्रे आदी सामान वाहून गेले होते. ही बाब लक्षात घेऊन महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने 11 हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, आयुक्तांसह, प्रशासनाने अशा प्रकारे मदत देण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. तसेच साहित्य देऊ असा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता अचानक प्रशासनाने अनुदान बँकेत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, अनुदानाच द्यायचे होते, तर दोन महिने कशासाठी लावले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.