बाधितांचा आकडा 900च्यावर : दुबार पंचनामे झाल्याची शक्यता
पुणे : खडकवासला कालवा दुर्घटनेत 600 ते 700 घरे बाधीत झाल्याचे सांगण्यात येत असतानाच जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्याचा आकडा मात्र 900 च्यावर गेला आहे. त्यामुळे दुबार पंचनामे झाले असल्याचे सांगत, प्रशासनाकडून पुन्हा सर्व पंचनामे तपासण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली. अद्यापही काही नागरिकांकडून पंचनामे करताना, नुकसान झालेल्या वाहनांची माहिती घेण्यात आलेली नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे करण्यात येत आहेत.
कालवा दुर्घटनेनंतर दांडेकर पुला जवळील स.नं. 130, 133 आणि 124 मध्ये 650 ते 700 घरांमध्ये पाणी घुसले होते. त्यातील 60 घरे वाहून गेली होती. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तातडीने 10 पथकांची नियुक्ती केली होती. मात्र, पंचनामे करताना, अनेक पंचनामे दुबार झाले असून त्यांची छाननी पुन्हा सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातच रेशनिंग धान्य वाटपाचे आदेश असून त्यासाठी पंचनाम्यांची यादी घेऊन काम करण्याच्या सूचना आहेत. मात्र, ही यादी आणि नेमकी माहिती नसल्याने पालिका प्रशासनची धावपळ सुरू आहे.
अद्यापही काही नागरिकांचे पंचनामे होणे बाकी
रात्री उशीरा महापालिकेच्या अधिकार्यांकडून पंचनाम्यांची आणखी एक माहिती देण्यात आली असून त्यात 60 पूर्णत: बाधीत तर 650 अंशत: बाधीत घरे असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडूनच ही माहिती देण्यात आली असली तरी अद्याप बाधितांची यादी महापालिकेस मिळालेली नसून ही माहिती फोनवरून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच अद्यापही काही नागरिकांचे पंचनामे होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.