कालवा फुटीचा अहवाल नाही

0

पुणे : उजवा मोठा कालवा फुटून शेकडो जणांचे संसार उद्ध्वस्त होऊनही कालवा फुटण्याची कारणे शोधण्यात महापालिका आणि पाटबंधारे खाते कमी पडले आहे. ही दुर्घटना घडून सव्वातीन महिने झाले तरी कालव्याची अवस्था, तो फुटण्याची कारणे आणि दुर्घटनाग्रस्त लोकांना मिळालेली मदत यांचा अहवाल सरकारकडे पोचलेला नाही. त्यामुळे कालवा फुटीची घटना पाटबंधारे खात्याने व महापालिकेने फारशी गांभीर्याने घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातून वाहणारा उजवा मोठा कालवा फुटल्याने जनता वसाहत व दांडेकर पूल परिसरातील शेकडो घरांचे नुकसान झाले. कालव्याला भगदाड पडल्याने तो फुटल्याचे कारण देण्यात आले. पालिका, पाटबंधारे खाते व संबंधित यंत्रणेमधील अधिकार्‍यांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कालवा फुटण्याची कारणे शोधून त्याबाबतचा अहवाल 15 डिसेंबरपर्यंत देण्याची सूचना दिली होती. प्रत्यक्षात मात्र एखादी-दुसरी बैठक घेऊन समितीचे कामकाज गुंडाळण्यात आले. त्यानंतर अहवाल पाठवण्याकडेही समितीचे दुर्लक्ष झाले.