पुणे : मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर जनता वसाहतीत पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नीलम गायकवाड आणि संतोष लक्ष्मण सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोहगाव विमानतळावर सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.
कालवा फुटल्यानंतर जनता वसाहतीत पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले. या पाण्यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने अडकले होते. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस काँस्टेबल गायकवाड यांनी याही परिस्थिती स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहात जात दोराच्या साहाय्याने ७ ते ८ नागरिकांना बाहेर काढले. जखमी असलेल्या एका लहान मुलाला पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी आणले. सूर्यवंशी यांनी तीन लहान मुले व त्यांच्या मातांना पाण्याच्या प्रवाहाबाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले़. त्यांच्या या धाडसाने सर्वांनीच कौतुक केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी लोहगाव विमानतळावर त्यांच्या हस्ते शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन या दोघांचा गौरव करण्यात आला.