घोरपडी । अनेक वर्षांपासून डावा कालवा बंद आहे. त्यातून पाणी सोडले जात नाही. परंतु त्यात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच स्थानिक नागरिक त्याच कालव्यात कचरा टाकत असल्यानेही पाणी साचून राहते आहे. त्यामुळे डासांची संख्या वाढते आहे. सोपानाबागेतील पाठीमागच्या बाजूला कालव्यात अनेक दिवसांपासून बाभळीचे झाड पडले आहे. यामुळे तिथे कचरा अडकला आहे. या साठलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच रस्त्यांच्या कडेला वाढणारे गवत, कचर्यांचे ढिग यातूनही डास तयार होतात आणि दुर्गंधी पसरू लागली आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे परिसरात साथीचे आजार वाढले आहेत.
घोरपडी, मुंढवा आणि केशवनगर परिसरातील दवाखाने या डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरियाच्या आजारांच्या रुग्णांनी भरले आहेत. खासगी दवाखान्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. दररोज शेकडो रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी येत आहेत. साफसफाईचा अभाव आणि डासांची वाढती संख्या यामुळे भविष्यात अशा साथीचे आजार आणखी पसरणार अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
कालव्याच्या स्वच्छतेबाबत आम्ही महापालिका स्वच्छता विभागाला संपर्क केला असता ती पाठबंधारे विभागाची जबाबदारी आहे असे सांगितले तर पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की तो कालवा बंद असल्याने कालवा स्वच्छतेची आमची जबाबदारी नाही. कालव्याच्या सफाईची जबाबदारी दोन्ही विभाग एकमेकांवर ढकलत आहेत. यात मात्र नागरिकांचे हाल होत आहे.
यावर्षी पुण्यातील सर्वांत जास्त 103 अधिकृत डेंग्यूचे रुग्ण ही मुंढवा-हडपसर परिसरात आढळले आहेत. तसेच चिकनगुनियाचे 39 रुग्ण ही ढोले-पाटील आणि मुंढवा हडपसर परिसरात म्हणजे सर्वांत जास्त येथेच सापडले आहेत. 143 रुग्णांपैकी 39 रुग्ण जर या परिसरात सापडत असतील तर याला जबाबदार महापालिका आहे. आतापर्यंत पालिकेने काही लोकांना नोटिस पाठवल्या आहेत, परंतु कडक कारवाईची गरज आहे. ज्याप्रमाणे नागरिकांवर कारवाईची गरज आहे. तसेच सार्वजनिक परिसरातील अस्वच्छतेसाठी प्रशासनावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.