खत निर्मिती केल्यास सेंद्रिय शेतीला मिळणार चालना; रसायन मिश्रित अन्नधान्यापासून पुढील पिढी वाचू शकेल
इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा उपक्रम
पिंपरी : घरातील ओल्या कचर्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केल्यास सेंद्रिय शेतीला चालना मिळेल. तसेच पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित आणि रसायन मिश्रित अन्नधान्यापासून दूर राहील. ओल्या कचर्यापासून खत निर्मिती केल्यास घरातून निघणार्या कचर्याची मोठी समस्या दूर होईल. यासाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने पुढाकार घेऊन ‘काला सोना’ नावाने जनजागृती अभियान सुरु केले आहे. या अभियानात सोशल मीडियावर माहिती पुरविण्यासह प्रत्यक्ष कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. हजारो रुपये खर्च करून जमिनीमध्ये रासायनिक खते टाकली जातात. पिकांवर विषारी रासायनिक औषधे फवारली जातात. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे आणि मानवी आरोग्य धोक्यात जात आहे. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून त्याऐवजी सेंद्रिय खतांचा वापर अधिक प्रमाणात करणे आवश्यक आहे. इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड ‘काला सोना’च्या माध्यमातून घरातील ओल्या कचर्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचे मार्गदर्शन करणार आहे.
हे देखील वाचा
निगडीमध्ये घेतली कार्यशाळा
इनर व्हील क्लबच्या माजी अध्यक्षा प्रणिता आलुरकर यांनी लँडमार्कच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन ‘काला सोना’ या सामाजिक प्रकल्पाची सुरुवात केली. त्या माध्यमातून निगडी येथे ओल्या कचर्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्याबाबत कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत 30 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला. स्वयंपाकघरातून दररोज किमान किलोभर ओला कचरा निघतो. त्यामध्ये पालेभाज्यांची देठे, खराब झालेली पाने, केळी, संत्री, मोसंबी यांसारख्या फळांच्या साली अशा प्रकारचा ओला कचरा असतो. हा कचरा आपण फार दिवस घरात ठेवू शकत नाही. शहरात तर परिस्थिती अत्यंत कठीण एखाद्या दिवशी महापालिकेची कचरागाडी आली नाही, तर दुसर्या दिवशी कचर्याचा वास येऊ लागतो. त्यामुळे या वास येणार्या कचर्याचा बहुतांश वेळेला तिरस्कार केला जातो. पण त्यापासून पुढील पिढीचे सुरक्षित भविष्य तयार होऊ शकते, याचा विचार कोणालाच येत नाही.
निःशुल्क कार्यशाळा घेणार
सायली माळवदकर इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या माध्यमातून निःशुल्क कार्यशाळा घेणार आहेत. त्यांनी आजवर 100 पेक्षा अधिक कार्यशाळा घेतल्या असून केवळ घरोघरी कंपोस्ट खत निर्मिती होण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. घराच्या अगदी लहान कोपर्यांमध्ये देखील हे खत तयार होऊ शकते. त्यासाठी मोठी जागा किंवा मोठी गुंतवणूक करावी लागणार नाही. आपण तयार केलेल्या कंपोस्ट खतामध्ये पालेभाज्या लावून स्वतः शेतीचा आनंद देखील घेता येतो. त्यामुळे सर्व भगिनी यासाठी मार्गदर्शन घेऊन ही प्रक्रीया समजून घेणे गरजेचे आहे.