जळगाव । कांचन नगरात असलेल्या कालिंका माता मंदिरातील दान पेटी फोडून चोरट्यांनी त्यातील चार हजाराच्यावर रोकड लंपास केली आहे. ही रक्कम चोरुन नेत असताना दानपेटीत आणखी शंभराच्या काही नोटा व चिल्लर पेटीतच आढळून आल्या आहेत. चोरी करताना पकडल्या जाण्याच्या भीतीने चोरट्याने दानपेटी अर्धवट उघडी सोडून पळ काढल्याची शक्यता आहे.
लोखंडी सळईने कुलूप तोडले
कांचननगरात कालिंका मातेचे एक लहान मंदिर अनेक वर्षापासून आहे. या मंदिराला ट्रस्टी अथवा पुजारी नाही. गल्लीतील नागरिकच तेथे देखभाल करतात. दर्शनाला जाणारे भक्त तेथील दान पेटीत दान स्वरुपात पैसे टाकत असतात. शुक्रवारी सकाळी गल्लीतील काही तरुणांना ही दान पेटी अर्धवट उघडी व कुलुप तुटलेले दिसले. ही घटना त्यांनी लागलीच शनी पेठ पोलिसांना कळवली. पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी तातडीने घटनास्थळी कर्मचारी रवाना केले. जितेंद्र सोनवणे, अमित बाविस्कर, नरेंद्र ठाकरे व गणेश गव्हाळे यांनी मंदिरात जावून पाहणी केली असता लोखंडी सळईच्या सहाय्याने कुलुप तोडण्यात आल्याचे दिसून आले. दानपेटी व कुलुप जीर्ण झालेले आहे.
यापुर्वीही चोरीचा प्रयत्न
परिसरात पोलिसांनी चौकशी केली असता ठोस माहिती मिळाली नाही, मात्र कोणीतरी मद्यपीने हे कृत्य केल्याचे लक्षात येते. कोणीतरी आल्याच्या संशयाने त्याने दापपेटी अर्धवट उघड सोडून पळ काढला आहे. या परिसरात कोणाकडेच सीसीटीव्ही फुटेज नाही. तसेच मंदिराला संरक्षण भिंत अथवा प्रवेशद्वार नाही. याआधीही हात घालून पैसे लांबविण्याचा प्रयत्न झाला होता असे कांचन नगरातील काही जणांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी कोणीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल होवू शकला नाही.