एरंडोल। भरधाव वेगाने जाणार्या प्रवासी वाहतूक करणारी काली-पीली वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन तिन ते चार वेळेस पलटी झाल्यामुळे झालेल्या अपघातात पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडे अकरा वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जवळील दत्तमंदिराजवळ घडली. अपघातानंतर वाहन चालक वाहन अपघात स्थळी सोडुन व वाहनातील जखमी प्रवाशांना सोडुन फरार झाला. अपघाताची माहिती समजताच आमदार डॉ.सतिश पाटील यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय पाटील, विश्वास पाटील, पत्रकार कमरअली सय्यद व नागरिकांनी जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली.
वाहन पलटल्यामुळे बालकाचा मृत्यू: याबाबत पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील आडगाव येथील नवल लोटन पाडसे हे आपला पुतण्या महेश सोपान पाडसे (वय-5) हा आजारी असल्यामुळे त्यास उपचारासाठी एरंडोल येथे दवाखान्यात आणले होते. त्याचेवर दवाखान्यात उपचार झाल्यानंतर ते पुतण्यासह काली-पीली प्रवासी वाहतूक करणारे वाहन क्रमांक (एमएच 19 जे 1052) ने घरी आडगावकडे जाण्यासाठी बसले होते. एरंडोल-कासोदा या अमळनेर नाक्यापासुन ते पालिकेच्या सार्वजनिक उद्यानापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला असल्यामुळे व ठीक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे काली-पीली चालकाने आपल्या ताब्यातील वाहन जुन्या रस्त्यावरून न नेता राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या दत्त मंदिराजवळून नेले. भरधाव वेगाने जात असलेले काली-पीली वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दत्त मंदिराजवळ असलेल्या वळणावर सदरचे वाहन चार ते पाच वेळेस पलटी झाले. वाहन पलटल्यामुळे त्याखाली दबुन महेश सोपान पाडसे या पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यु झाला.तर वाहनातील मृत महेशचे काका नवल लोटन पाडसे व संदीप उर्फ गणेश माधवराव पाटील दोन्ही राहणार (आडगाव ता.एरंडोल) व अन्य एक प्रवासी किरकोळ जखमी झाले.
वाहनचालक फरार
अपघातानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ना घेता जखमींना तसेच सोडुन वाहन चालक वाहन सोडुन फरार झाला. मयत महेश याचे आई – वडील शेतात मजुरीचे काम करतात. त्यास एक मोठा भाऊ आहे. याबाबत नवल पाडसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून काली पिली वाहन चालक प्रवीण (पुर्ण नाव माहित नाही) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोनि बाळासाहेब केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नारायण पाटील करीत आहे.