मुंबई: आज मराठी भाषा दिन आहे. त्यानिमित्ताने विधान भवनात कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांच्यासह दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार उपस्थित आहे. यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेविषयी विचार व्यक्त केले. काल सर्व माध्यमातील शाळेत मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यावेळी कोणीही या निर्णयाला विरोध केला नाही, त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच मला सभागृहात बसावेसे वाटले असे वक्तव्य केले.
सभागृहात नेहमीच प्रत्येक विषयाला विरोध केला जात असतो, मात्र काल मराठी भाषेबाबतच्या विषयाला कोणीही विरोध केला नाही त्यामुळे मला बरे वाटले असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मराठी भाषा ही शक्तीची आणि भक्तीची आहे. भाषा आणि संस्कृती टिकली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करणार असून केंद्र सरकारकडे सर्व पुरावे देणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.