पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे हे कुणबी जातीचे असल्याचा निवाडा पुणे विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सोमवारी केला. यावर ‘आपण कुणबीच आहोत. प्रतिस्पर्ध्यांनी विनाकारण त्रास देण्यासाठी प्रमाणपत्राला आक्षेप घेतला होता. अखेर सत्याचा विजय झाला आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर त्यांच्याविरूद्धचे तक्रारकर्ते मृणाल ढोले म्हणाले, प्रमाणपत्र वैध ठरल्याचे अद्यापपर्यंत आपल्याकडे काहीच आले नाही. वैध ठरले असल्यास त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल.
जातीचे 16 पुरावे ग्राह्य
काळजे यांनी प्रभाग क्रमांक तीन चर्होली-मोशीमधून ओबीसी प्रवर्गातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांनी सादर केलेला कुणबी जातीचा दाखला बनावट असल्याचा आक्षेप त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व माजी नगरसेवक घन:श्याम खेडकर यांनी घेतला होता. यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती. त्यानंतर काळजे यांच्या जात प्रमाणपत्राची चार महिन्यांत फेरपडताळणी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागांतर्गत असलेल्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला होता. त्यासाठी न्यायालयाने समितीला चार महिन्यांची मुदत दिली होती. जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत दक्षता समितीसमोर तीन ते चार वेळा सुनावणी झाली. काळजे यांनी कुणबी जातीचे असल्याचे 16 पुरावे जोडले होते. त्यानंतर दक्षता समितीने त्यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र वैध ठरवले आहे.
प्रकरण निकालात
याबाबत महापौरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांची बाजू मांडणारे अॅड. सुधाकर आव्हाड, अमित आव्हाड यांच्यासह सभागृह नेते एकनाथ पवार, निखील बोडके, सचिन वाघ उपस्थित होते. अॅड. सुधाकर आव्हाड म्हणाले की, काळजे यांना 2011 सालीच कुणबीचे प्रमाणपत्र दिले होते. त्याच प्रमाणपत्राच्या आधारे 2017 ची महापालिका निवडणूक त्यांनी लढविली होती. जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरताना जाती नोंदी, महसूल अभिलेखावरील नोंदी आणि वंशावळ पाहिली जाते. काळजे यांनी तेच पुरावे दिले होते. तसेच त्यांची कागदपत्रे कुटुंबाशी निगडीत आहेत. 1985 च्या सालची कागदत्रे दिली होती. जुन्या दस्तऐवजाची विश्वासर्हता जास्त असते. चौकशी समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून हे प्रकरण निकाली काढले आहे.