संततधार पावसाने माहूर धरण तुडुंब भरले

0

पुरंदर : गराडे-माहूर गावाची जीवन वाहिनी असणारे माहूर धरण काळदरी खोर्‍यात पाऊस पडल्याने पूर्ण भरून वाहू लागले आहे. दरवर्षी माहूर धरण 15 जुलैच्या आसपास पूर्ण भरलेले असते. परंतु यावर्षी पावसाला जोर नसल्याने थोडा उशीर झाला. तरी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. माहूरजाई पाणी वापर संस्थेचे सर्व पदाधिकारी व लाभधारक शेतकरी यांनी गुरुवारी सकाळी श्रीफळ अर्पण करून विधिवत जलपूजन केले.

यावेळी माजी आदर्श जि.प. सदस्य हेमंतकुमार माहूरकर, शरदराव जगताप, माहुरजाई पाणी वापर संस्थेचे सचिव प्रा. रामचंद्र जगताप, रोहिदास गोळे, माजी सरपंच हनुमंत माहूरकर, तुकाराम जगताप, परशुराम जगताप, हनुमंत जगताप, विजय महाराज अधिकारी, संतोष शिंदे, विकास जगताप, राजेंद्र माहूरकर व संस्थेचे पदाधिकारी, लाभधारक शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

माहूर लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता 84 दशलक्ष घनफूट आहे. व या प्रकल्पाखाली जवळपास 750 हेक्टर जमीन ओलिताखाली येते. या प्रकल्पाचे पाणी माहूर प्रकल्पाची पाणी वापर संस्था व लाभधारक शेतकरी नियोजन करून दरवर्षी जूनअखेरपर्यंत पाणी पुरवतात. त्यामुळे शेतकर्‍यांना कधीही पाण्याची टंचाई जाणवत नाही. शेतकर्‍यांमध्ये पाणी बचतीची जाणीव असल्यामुळे सर्वांच्या सहमतीने तलावातील पाणी उपसा 3 ते 4 दिवस बंद ठेवला जातो. ज्यायोगे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन उन्हाळ्यात तीव टंचाईच्या काळात देखील पाण्याचा मोठा साठा शेतकर्‍यांना वापरासाठी शिल्लक राहतो. या नियोजनामुळे प्रत्येक दिवशी अर्धा दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होते. पाणी बचतीसाठी माहुरच्या शेतकर्‍यांनी 800 एकर ऊस व इतर भाजीपाला पिकांसाठी ठिंबकचा मोठ्या प्रमाणात करतात.

यावर्षी 100 एकर क्षेत्र ठिबक करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. तालुक्यातील उर्वरित अन्य धरणेही लवकरात लवकर भरो, जलसंपदा हीच खरी राष्ट्रीय संपत्ती आहे. संपूर्ण शेतकर्‍यांना या पाण्याचा लाभ होवो. अशी प्रार्थना यावेळी हेमंतकुमार माहूरकर यांनी केली.