काळभोर गँगच्या दोन गुंडांच्या मुसक्या आवळल्या

0

दोन गावठी पिस्तुलासह काडतुसे हस्तगत
गुन्हे शाखेसह गुंडा स्कॉडच्या पथकांची कारवाई

पिंपरी-चिंचवड : कुख्यात सोन्या काळभोर टोळीतील दोन गुंडांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा व गुंडा स्कॉडच्या पथकांना यश आले आहे. अत्यंत शिताफीने व सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. अजय विलास काळभोर (वय 25, रा. अडवाणी कंपनीसमोर, काळभोरनगर) आणि तिरुपती उर्फ बाब्या शिवाजी जाधव (वय 24, रा. रामनगर, चिंचवड) अशी या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना या गुंडांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिस नाईक तानाजी गाडे यांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी पिंपरी न्यायालयातून आरोपीच्या घराची झडती घेण्याचे वारंट मिळवून, अजय काळभोरच्या घरी छापा टाकला व झडती घेतली असता, गावठी पिस्तूल व तीन काडतुसे मिळून आली. तर आरोपी अजय हा घराच्या पोटमाळ्यावर लपून बसला होता. त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. तर बाब्याला सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून जाऊ लागला होता. त्याला शिताफीने पकडून त्याच्याजवळून एक गावठी कट्टा व एक जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले होते. या दोघांनाही न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. या घातक शस्त्रांच्या सहाय्याने आरोपींनी कोणकोणते गुन्हे केलेत, याची माहिती पोलिस घेत होते.

मध्यप्रदेशातून आणले गावठी कट्टे
पोलिस नाईक तानाजी गाडे यांना काळभोर व जाधव याच्याकडे शस्त्रसाठा असल्याची गोपनीय खबर मिळाली होती. त्याआधारे गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉडचे पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी या दोघांविरोधात पिंपरी न्यायालयातून सर्च वॉरंट प्राप्त केले. त्यानंतर अत्यंत गोपनीय पद्धतीने या दोघांच्या घरी छापा टाकला. काळभोर नगरातील अजय काळभोरच्या घरी पोलिस गेले असता तो पोटमाळ्यावर लपून बसला होता. त्याच्या घराच्या कसून झडतीत एक गावठी पिस्तूल व तीन काडतुसे मिळून आली. तसेच अजय काळभोरला पोलिसांनी ताब्यात घेतले. एकूण 25 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला, त्याच्याविरोधात निगडी पोलिस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने दत्ता आगलावे (रा. चिंचवडेनगर) या मित्रासोबत मध्यप्रदेशातून दोन पिस्तूल आणल्याची कबुली दिली. दुसरे पिस्तूल तिरुपती उर्फ बाब्या शिवाजी जाधव याच्याकडे ठेवले होते, त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून बाब्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गुंड अट्टल गुन्हेगार
अजय काळभोर व बाब्या जाधव हे कुख्यात सोन्या काळभोर टोळीतील गुंड असून, त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, गंभीर दुखापत, कट रचने, वाहनांची तोडफोड करणे, गावठी कट्टे, पिस्टल बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, चॅप्टर केस व तडिपारी व एमपीडीएचीदेखील या दोघांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार, पोलिस नाईक तानाजी गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पिंपरी-चिंचवड शहरात संघटीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेक टोळ्यांचा समूळ नायनाट करण्याची गरज निर्माण झालेली आहे.