पिंपरी : प्रतिनिधी – कुप्रसिद्ध गुंड अजय काळभोर टोळीतील गुंडाकडून दोन गावठी पिस्तूल व चार काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुंडा स्क्वाड उत्तर विभाग गुन्हे शाखेकडून करण्यात आली. दत्ता विठ्ठल आगलावे (वय 25, रा.तुकाराम नगर, वाल्हेकवाडी) असे अटक केलेल्या गुंडांचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा एकूण 61 हजार 200 रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आला. त्याच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसात खून, कट रचणे, दरोड्याचा प्रयत्न तसेच गावठी कट्टे जवळ बाळगल्याचे चार गुन्हे दाखल आहेत. जप्त केलेली दोन पिस्तुल ही यापूर्वी अटक करण्यात आलेले अजय काळभोर व तिरुपती ऊर्फ बाब्या जाधव यांनी दिलेली होती. ही हत्यारे उमरठी, मध्यप्रदेश येथुन त्याच्या पुण्यातील ओळखीच्या लोकांना विक्री करुन पैसे कमवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ब्रम्हानंद नायकवाडी, सहा. निरीक्षक गणेश पवार व कर्मचारी राजू मोरे, भालचंद्र बोरकर, निलेश शिवतरे, किरण चोरगे, अतुल मेंगे, तानाजी गाडे, राजनारायण देशमुख, प्रदीप शेलार, नवनाथ चांदणे, शितल शिंदे यांनी केली आहे.