पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील काळवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या स्लॅबची गळती सध्या शिक्षकांसह पालकांचीही डोकेदुखी झाली आहे. इमारत बांधल्यापासून ही गळती अद्याप कायम असल्याची चर्चा सर्वशिक्षा अभियानाच्या अभियंत्यांनी दूर्लक्षित केल्यामुळेच आता ही गळती मोठया प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील काळवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेच्या इमारतीचे 2014 मध्ये उद्घाटन करण्यात आले. यावर्षीच पावसाळयामध्ये इमारतीचा स्लॅब गळका असल्याचे दिसून आल्याने शालेय व्यवस्थापन समिती आणि तत्कालीन मुख्याध्यापकांनी राजिप सर्वशिक्षा अभियानाच्या अभियंत्यांना तसेच पोलादपूर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकार्यांळना सांगितले. यानंतर सातत्याने गळक्या वर्गखोल्यांच्या दुरूस्तीबाबत काळवली उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी पाठपुरावा करूनही संबंधितांनी त्याकडे सपशेल दूर्लक्ष केले.
गळती थांबवण्यासाठी प्लास्टीकचा वापर
काळवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती मेहमूद तिवडेकर यांनी या नवीन इमारतीवर पावसाळयापूर्वी प्लास्टिकचे कापड टाकून गळती थांबविण्याची सूचना केली. त्यामुळे यंदाच्या पावसाळयात या स्लॅबगळतीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा असताना सोसाटयाच्या वार्या्सह पडणार्यात मुसळधार पावसामुळे स्लॅबवर टाकलेले प्लास्टीकचे कापड उडाले आणि स्लॅब गळायला सुरूवात झाली आहे. सध्या या नव्या इमारतीमध्ये स्लॅब गळत असल्याने बादल्या आणि टबासारखी प्लास्टीकची भांडी लावून गळणारे पाणी साठविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हरांडयापासून वर्गखोलीमध्ये जाताना ओले पाय घेऊन जावे लागू नये यासाठी पायपुसणे टाकावे लागले आहे.