काळवीट शिकारप्रकरणी 5 एप्रिलला निकाल

0

सलमान खानसह सर्वांची सुनावणी पूर्ण

जोधपूर : काळवीट शिकारप्रकरणी आरोपी सलमान खानसह सर्वांची सुनावणी बुधवारी पूर्ण झाली. जोधपूर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल 5 एप्रिलपर्यंत सुरक्षित ठेवला आहे. 20 वर्षांपासून याप्रकरणी सुनावणी सुरु होती. सलमान खानशिवाय सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे काळवीट शिकार प्रकरणी आरोपी आहेत.

चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान शिकार
1998 मध्ये हम साथ साथ है चित्रपटाचे शुटिंग जोधपूरमध्ये झाले होते. त्यावेळी आरोपी सलमान खान आणि इतर आरोपी घोडा फार्म हाऊस येथे थांबले होते. भवाद गावात 27-28 सप्टेंबरच्या रात्री त्यांनी काळवीटांची शिकार केली होती. यानंतर कांकणी गावात 1 ऑक्टोबर रोजी काळवीटांची शिकार केल्याचा आरोप झाला होता. 1998 मध्ये शुटिंगदरम्यान सलमान खानवर काळवीट शिकार प्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले होते. तीन खटले काळवीट शिकारीचे होते तर चौथा खटला आर्म्स अ‍ॅक्टचा होता. सलमान खानला अटक झाली तेव्हा त्याच्या रुममधून पोलिसांनी पिस्तूल आणि रायफल जप्त केली होती. या शस्त्रांचा परवाना संपलेला होता.

कांकाणी, घोडा फार्म हाऊस, भवाद, आर्म्स अ‍ॅक्टप्रकरण
कांकाणी प्रकरणात मुख्य न्याय दंडाधिकारी देवकुमार खत्री यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून, 5 एप्रिलपर्यंत निकाल सुरक्षित ठेवला आहे. घोडा फार्म हाऊस खटल्यात 10 एप्रिल 2006 मध्ये सीजेएम न्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात सलमान उच्च न्यायालयात गेला होता. उच्च न्यायालयात 25 जुलै 2016 ला सलमान निर्दोष सुटला. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. भवाद खटल्यात सीजेएम न्यायालयाने 17 फेब्रुवारी 2006 ला सलमानला दोषी ठरवले होते. यात त्याला 1 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणातही उच्च न्यायालयातून तो निर्दोष सुटला होता. या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. आर्म्स अ‍ॅक्ट खटल्यात 18 जानेवारी 2017 ला न्यायालयाने सलमानची सुटका केली. राज्य सरकारने सीजेएम न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सहा वर्षांचा कारावास होऊ शकातो
न्यायाधीश देवकुमार खत्री यांनी निकाल 5 एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे. वन्यजीव प्रतिबंधक कायदा 149 नुसार काळवीट शिकार प्रकरणी जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास शिक्षेची तरतूद आहे. काही वर्षांपूर्वी ही शिक्षा 6 वर्षांपर्यंत होती. सलमान खानचे प्रकरण 20 वर्षे जुने आहे, त्यामुळे त्याला जुन्या नियमानुसार 6 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यासोबतच त्याच्यासोबत याप्रकरणात सैफ अली, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रेही आरोपी असल्याने सहआरोपी म्हणून त्यांनाही हीच शिक्षा लागू होते.