काळाचौकीत गोदामात अग्नितांडव

0

मुंबई । मुंबईतील काळाचौकी परिसरातील गोदामात मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. गोदामाला आग लागल्यानंतर लागलीच गोदामालगतचा परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. काळाचौकी परिसरातील गोदामात मंगळवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास भीषण आग लागली. आग झपाट्याने पसरत गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

आगीचे सत्र सुरूच
8 डिसेंबर 2017 रोजी मुंबईतील कमला मिल परिसरात भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नवी मुंबईतील दुकानात लागलेल्या आगीने मायलेकीचा जीव घेतला, तर अंधेरीतील प्रेसमध्ये लागलेल्या आगीत युवकाचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय गोरेगावातील गोदामाला, घाटकोपर-मानखुर्द रोडवरील गोदामांना फेब्रुवारी महिन्यात आग लागली होती. दरम्यान, आज मंगळवारीच सकाळी डोंबिवलीतील सारस्वत कॉलनीतील एका गोदामातही आग लागली होती. एका इलेक्ट्रॉनिक शोरूमचे हे गोदाम आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

डझनभर बंब घटनास्थळी दाखल झाले
अग्निशमन दलाचे 12 बंब, 12 पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसरात धुराचे लोण पसरलेे. घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले. ईस्टर्न मेटल कंपनीचे हे गोदाम आहे. या एकमजली गोदामात आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजून अस्पष्ट आहे. आगीचे भीषण रूप पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोदामालगतचा परिसर रिकामा करण्यात आला. या गोदामात केमिकल पदार्थांचा साठा असल्याने आग लागल्यानंतर परिसरात सर्वत्र धूर पसरला, त्याचा त्रास आसपासच्या नागरिकांना होऊ लागला.