काळाप्रमाणे बदलाल तरच पत्रकारीतेतील स्पर्धेच्या युगात टिकाल

0

अ‍ॅड.नितीन खरे : भुसावळात पत्रकार दिन उत्साहात

भुसावळ : वाढत्या सोशल मिडीयाच्या स्पर्धेतही प्रिंट मिडीयाचे महत्व अबाधीत असून ते कायम राहणार आहे मात्र बदलत्या काळाप्रमाणे पत्रकारांनी अपडेट होणे गरजेचे आहे व तसे केल्यानंतर स्पर्धेच्या युगात टिकाव लागणे शक्य असल्याचे स्पष्ट मत सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिनानिमित्त पंचायत समिती सभागृहात सोमवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यांची विचार मंचावर उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विलास भाटकर होते. प्रसंगी व्यासपीठावर उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे, पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, शेख सत्तार, शेख नवलसिंग राजपूत उपस्थित होते. सुरूवातीला दीपप्रज्वालन व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सकाळचे पत्रकार श्रीकांत जोशी यांनी केले.

सोशल मिडीयावरील बातमी खात्री करूनच फॉरवर्ड करा
यावेळी मार्गदर्शन करतांना अ‍ॅड.खरे म्हणाले की, आधीच्या व आत्ताच्या पत्रकारीतेत मोठा बदल झाला आहे. पूर्वी पत्रकाराने लिहिलेली बातमी वृत्तपत्ताच्या कार्यालयापर्यत पोहोचविण्यास अर्धा दिवस जात होता मात्र आता अद्यावत मोबाईलमुळे एका क्षणात कार्यक्रमाची बातमी व फोटो वृत्तपत्राच्या कार्यालयात पोहचते. हल्ली स्पर्धेचे युग असून प्रिंट मिडीयावर अजूनही वाचकांना विश्वास आहे मात्र सोशल मिडीयावरही ब्रेकींग न्यूज म्हणून बातम्या येत असतात आणि आपण त्या पुढे पाठवित असतो मात्र या बातम्या पाठवितांना त्या बातम्यांची सत्यता पडताळून पहावी, नुसते ब्रेकींगच्या नावाखाली अफवा पसरविल्या जातील अशी पत्रकारीता करू नये, असे आवाहन करीत अ‍ॅड.खरे म्हणाले की, आपल्या बातमीने कोणाची विनाकारण बदनामी तर होणार नाही ना याची काळजी घ्यावी.

निपक्षपणे चालावी लेखणी -गजानन राठोड
डीवायएसपी गजानन राठोड म्हणाले की, लोकशाहीतील चौथा स्तंभ हा पत्रकारीतेचा आहे त्यामुळे पत्रकारांनी बातमी देतांना विचार करून बातमी द्यावी, ज्या बातमीने विनाकारण कोणाची बदनामी होईल, अशी पत्रकारीता करू नये. बातम्या देतांना वास्तवतेचे भान ठेवावे, बातम्यांमध्ये विरोधाभास निर्माण निर्माण होईल, असे वृत्तांकन करू नये, पत्रकाराची लेखणी ही निपक्षपणे चालली पाहीजे, सामाजिक भान ठेवून पत्रकारीता करावी, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकारही शेवटी माणूसच आहे, हे लक्षात ठेवावे, कुठेही घटना घडल्यास तत्काळ पत्रकार तेथे पोहचत असतात. त्यामुळे सत्य माहिती समाजासमोर ठेवण्याचे काम पत्रकारांचे असल्याचे राठोड यांनी सांगितले.य ावेळी पंचायत समिती सभापती मनीषा पाटील व गट विकास अधिकारी विलास भाटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या पत्रकारांचा झाला सन्मान
पत्रकारीता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या छायाचित्र व पत्रकारांचा प्रसंगी मान्यवरांनी सन्मान केला. त्यात दैनिक जनशक्तीचे ब्युरो चीफ गणेश वाघ, दैनिक देशदूतचे कार्यालय प्रमखु निरज (मोना) वाघमारे, ‘लोकमत’चे पत्रकार उत्तम काळे, दिव्य मराठीचे श्रीकांत सराफ, दैनिक नवभारत टाईम्सचे विजयकुमार ठक्कर व ‘लोकमत’चे छायाचित्रकार श्याम गोविंदा यांना सन्मानीत करण्यात आले.