काळाबाजार साठेबाजी केल्यास कठोर कारवाई होणार

0

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा इशारा

जळगाव– कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे या काळात किराणा भाजीपाला फळ औषधालय दुग्धजन्य वस्तू यांची विक्री सुरू राहणार आहे तरी या काळात संधी साधून कुणी साठेबाजी किंवा काळाबाजार आणि वस्तूंची चढ्या भावाने विक्री केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लावून संदर्भात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त पत्रकार परिषद आज नियोजन सभागृहात पार पडली. यावेळी पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जळगाव जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. किराणा दुकान भाजीपाला मार्केट याठिकाणी विनाकारण गर्दी करू नये किराणा आणि भाजीपाला यांच्यासह औषधालय दुग्धजन्य वस्तूंचा पुरवठा बंद होणार नाही. नागरिकांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही हे जिल्ह्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. तरीदेखील नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रत्येकाने शिस्त पाळावी संयम राखावा तरच कोरोनाशी मुकाबला करणे शक्य आहे. नागरिकांना हे नुतन वर्ष आरोग्यमय जावो अशा शुभेच्छाहि पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

यंत्रणेवरिल ताण वाढवु नका- जिल्हाधिकारी
देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी लॉकडाऊनचा अर्थ समजून घ्यावा. जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा कायम सुरू राहणार आहे तरी कुणीही गर्दी करून यंत्रणेवर दबाव आणू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच जळगाव जिल्ह्यात तालुका रुग्णालयांमध्ये आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. सर्दी-खोकला झाला म्हणून जळगाव येथे येऊन सामान्य रुग्णालयात गर्दी करू नये. तालुका पातळीवर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर आणि नर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2000 नागरिकांचे क्वारंटाइन होईल एवढी व्यवस्था उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीला 40 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. धान्यासह इतर कुठल्याही जीवनावश्यक वस्तूंचे टंचाई नसून ही वेळ पैसे कमावण्याची नाही तर सेवा देण्याची असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
सॅनिटायझर आणि मास्कचा साठा करू नये. जिल्ह्यात सॅनिटायझर आणि मास्कची चढ्या भावाने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासंदर्भात औषध विक्रेत्यांची चर्चा झाली असून 100 एमएल सॅनिटायझरची किंमत ५० रुपये तर मास्कची किंमत ८ रुपये निश्चित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी पत्रकार परिषदेस महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक नागोराव चव्‍हाण, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माहिती अधिकारी विलास बोडके आदी उपस्थित होते.