काळा पैशाविरुद्धची लाढाई सुरूच राहणार

0

पुणे । काळा पैसा, भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू केलेली लढाई 50 दिवसांनंतरही सुरूच राहील. इमानदार लोकांना यापुढे त्रास होणार नाही, बेईमानांना मी सोडणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केल्याबद्दल देशवासियांचे आभार मानले. तसेच, केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यानेच पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये मेट्रो धावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर संध्याकाळी पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, मनुष्यबख विकासमंत्री प्रकाश जावडेकर, रस्तेवाहतूक व जहाजबांधी मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी- चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा दिला इशारा
पंंतप्रधानांनी अपेक्षेप्रमाणे नोटाबंदीच्या निर्णयावर या सभेतही भाष्य केले. देशातील बैनामी संपत्तीला आळा घालण्यासाठी 1988 मध्येच संसदेत कायदा संमत करण्यात आला होता. मात्र, तो कधीही लागू केला गेला नाही. या कायद्याचे कागद सरकारी फायलींतच हरवून गेले होते. ते मी सत्तेत आल्यावर बाहेर आले. आता यापुढे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. केवळ बँकेत भरले म्हणून काळे धन पांढरे होणार नाही, असा इशारा देत मोदी म्हणाले, की असा प्रयत्न काही लोकांनी केला. परंतु, त्यांच्या धनाप्रमाणेच त्यांचे तोंडही काळे झाले. असा प्रयत्न करणारे नोकरशहा आणि काही लोक आता तुरुंगाची हवा खात आहेत. तसेच, आपण बँकेत पैसे भरू, कोण आपली चौकशी करणार आहे, असाही काहींचा समज आहे. पण त्यांनीही निर्धास्त राहू नये. त्यांचीही चौकशी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

मेट्रोच्या विलंबावरून काँग्रेसवर टिका
पुणे मेट्रोला झालेल्या विलंबावरूनही पंतप्रधानांनी काँग्रेसच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आधीच्या सरकारांनी वेळेवर चांगली कामे केली नाहीत. त्यामुळेच शहरांचे आणि गावांचे प्रश्‍न आज जटील बनले आहेत. आधीच्या सरकारांनी ही कामे न केल्याने ती करण्याची चांगली संधी मला मिळते आहे आणि ही संधी मी वाया घालवणार नाही.

वाढत्या शहरीकरणाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, तत्कालीन राजकीय लाभ बाजूला ठेवून दूरगामी विचार करून विकासकामांचे नियोजन करण्यावर भर द्यावा लागणार आहे आणि त्यालाच आमच्या सरकारने प्राधान्य दिले आहे. पुढील 25- 30 वर्षांचा विचार करून व वाढत्या गरजा लक्षात घेऊनच शहरे आणि गावांचे विकास आराखडे तयर करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. आधीच्या सरकारांनी असे नियोजन केले नाही. तसेच, हाती घेतलेले प्रकल्प किंवा कामे वेळेवरही पूर्ण केली नाहीत. त्यामुळेही विकास कामांवर अधिक निधी खर्च करावा लागला. आता आम्ही प्रत्येक प्रकल्प वेळेतच पूर्ण करण्यावर भर देत आहोत. शहरी आणि ग्रामीण भागाच्या समस्या वेगळ्या आहेत. परंतु, गावांकडून शहरांकडे होणारे स्थलांतर कमी करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरांत असणार्‍या सुविधा आणि संधी गावांमध्येच उपलब्ध करून देण्यावर आम्ही भर देत आहोत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

हाय- वे आणि आय- वे
तंत्रज्ञानाच्या विकासामुळेे आज जग बदलते आहे आणि त्याबरोबर देशही बदलतो आहे. या विकसित तंत्रज्ञााचा लाभ ग्रामीण भागाला मिळणे गरजेचे आहे. तसे झाल्यासच देश अधिक प्रगत होईल आणि विकसित तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील जीवनातही खर्‍या अर्थाने गुणात्मक बदल घडेल, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, त्यासाठीच संपूर्ण देशभरात ऑप्ठिकल फायबरचे जाळे विकसित करण्यात येत आहे. लोकांना आता फक्त हायवेच नव्हे, तर आय- वेही हवा आहे. उत्तम हायवेंबरोबर वेगवान आय- वे पुरवण्यासाटी आमचे सरकार कटिबद्ध आहे.

मेट्रो वेळेत धावेल
पुण्यात यापूर्वीच मेट्रो आली असती, असे सांगताना पंतप्रधानांनी काँग्रेस सरकारच्या अकार्यक्षमतेवर टीका केली. जर पूर्वीच वेळेवर निर्णय घेऊन हा प्रकल्प मार्गी लागला असता, तर पुण्यात आज मेट्रो धावू लागली असती. त्यामुळे या शहरात वाहतूक कोंडीची समस्या आजच्या इतकी तीव्र बनली नसती. तसेच, नागरिकांनीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरच भर देणे पसंत केले असते. आता हे काम आमचे सरकार वेळेत मार्गी लावेल.

डबल इंजिनामुळे विकासाला वेग
केंद्राप्रमाणेच राज्यातही भाजपला संधी देण्याचे आवाहन मी विधानसभा निवडणुकीवेळी केले होते. असे डबल इंजिन मिलाले, तर राज्याचा विकास वेगाने होईल, असेही मी तेव्हा म्हटले होते. आता राज्यात व केंद्राच भाजपचे सरकार असल्याने हे डबल इंजिन वेगाने विकास कामे मार्गी लावत आहे. या इंजिनामुळेच पुण्यात मेट्रो धावणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.