काळूस रस्त्यावरील प्रलंबित भूमिगत गटाराचे काम झाले सुरू

0

चाकण : लोकसहभाग आणि चाकण नगरपरिषद यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले चाकण शहरातील काळूस रस्त्यावरील विद्याधाम कॉलनी भागातील भूमिगत गटार योजनेच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. यासाठी परिसरातील नागरिक आणि व्यावसायिक यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे हे प्रलंबित काम सुरु झाले असून यासाठी लागणारे सिमेंटचे पाईप परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणी काढून उपलब्ध केले आहेत. तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून हे भूमिगत गटाराचे काम करण्यात येत आहे. काही अडचणीमुळे या गटार योजनेचे काम अनेक दिवस प्रलंबित होते, मात्र आता ते मार्गी लागणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

स्वत: अधिकार्‍यांची उपस्थिती
या भूमिगत गटाराचे काम होण्यासाठी चाकण नगरपरिषदेने अडचणी दूर केल्या. तसेच स्वतः अधिकार्‍यांनी थांबून पाचशे मीटर पेक्षा अधिक लांबीच्या भूमिगत गटाराचे काम मार्गी लावले, असे स्थानिक नागरिक शंकरराव कड, नीलेश कड, माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड, रामचंद्र आवटे, पांडुरंग शिरसाट, नगरसेविका अनिता कौटकर, अश्‍विता कुर्‍हाडे, किरण कौटकर आदींनी सांगितले.

अतिक्रमणे हटविण्याचे लेखी आदेश
दरम्यान, येथील शेतकरी उत्तम धाडगे यांनी काही संस्थांनी रस्त्यात अतिक्रमणे केल्याची तक्रार खेड तहसील कार्यालयात केली होती. त्यामुळे संबंधित कण-आगरवाडी-काळूस रस्त्याच्या दक्षिण बाजूला रस्त्यात असलेली अतिक्रमणे सुद्धा काढून घेण्याचे लेखी आदेश तहसीलदार सुनील जोशी यांनी चाकण नगरपरिषदेला दिले आहेत. त्यामुळे संबंधित रस्ता प्रशस्त होणार आहे.