हडपसर-महापालिकेने हडपसरमध्ये विविध भागात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले नवीन रस्ते आणि पदपथ वाहनचालक व पादचार्यांसाठी बांधले असले तरी प्रत्यक्षात मात्र, अनधिकृत फेरीवाले, भाजीवाल्यांनी त्यावर अतिक्रमण करून ताबा घेतला आहे.
हडपसर पाठोपाठ खास करून काळेपडळ आणि तुकाईटेकडी या भागात हजारच्या जवळपास छोटे विक्रेते बिनबोभाटपणे धंदा करीत असून येथील फळे व भाजीविक्रेते मोठ्या दादागिरीने व्यावसाय करत आहेत.
कारवाईनंतरही पुन्हा बस्तान
हडपसर, गाडीतळ, ससाणेनगर, हांडेवाडी रोड या भागांत रस्ते आणि पदपथावर फळे व भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण असतानाच काळेपडळ तुकाईटेकडी भागात आता मोठ्या प्रमाणात मिळेल त्या जागी अतिक्रमण करून जागा ताब्यात घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. महापालिकेने अशा अनधिकृत फेरीवाल्यांवर अनेक वेळा कारवाई केल्यानंतरही पुन्हा ते बस्तान मांडतात. रस्ते आणि पदपथावरून चालण्याचा पहिला हक्क हा पादचार्यांचा असतो, असे धडे वाहतूक पोलीस विभागाकडून दिले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचे पालन करणे नागरिकांना कठीण झाले आहे. हांडेवाडी रस्ता, काळेपडळ, तुकाईटेकडी परिसरात फेरीवाल्यांचे जणू माहेरघर आहे. तुकाईटेकडी समोरून काळेपडळकडे जाणार्या रस्त्यावर फेरीवाले आणि छोटे विक्रेते असल्यामुळे सायंकाळच्यावेळी नागरिकांना त्या मार्गाने पायी चालणे कठीण झाले आहे. येथील वाढलेल्या अतिक्रमाणांबाबत पालिका अधिकार्यांना वारंवार कळवूनही ठोस कारवाई केली जात नाही.
ग्राहकांना दमबाजी करण्यापर्यंत तुकाईटेकडी काळेपडळ भागात अतिक्रमण केलेल्या या अनधिकृत व्यावसायिकांची मुजोरी वाढली आहे. सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच या भागातील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही या मुजोर व्यावसायिकांच्या दादागिरीचा सामना करावा लागत आहे. आम्ही हप्ते देतो, त्यामुळे आम्हांला कोणीच हटवू शकत नाही, अशी भाषा थेट लोकप्रतिनिधींना येथील बेकायदेशीर व्यवसाय व अतिक्रमणधारकांकडून केली जात आहे.
कारवाई का नाही?
येथे रस्त्यावर व पदपथावर अनाधिकृत व्यावसाय करणार्या व्यावसायिकांकडून ग्राहकांना त्रास दिला जातो तसा तक्रारी आपल्याकडे महिलांनी केल्या आहेत. येथील अतिक्रमणे त्वरित हटवावीत याबाबत अधिकार्यांना सांगूनही कारवाई का केली जात नाही? असा सवालही नगरसेविका उज्ज्वला जंगले यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान याबाबत पालिका अधिकार्यांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.