चिंचवड : काळेवाडी परिसरात टवाळखोर तरुणांचा उपद्रव वाढत आहे. याचा परिसरातील महिला आणि मुलींना त्रास होत आहे. शालेय विद्यार्थिनी भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. त्यामुळे या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेविका नीता पाडाळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. नीता पाडाळे यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना पत्र दिले.
शाळा परिसरात रोडरोमिओंची संख्या कमी
या निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडीमधील तापकीर मळा चौक, भारतमाता चौक, साई पार्क मस्जिद रोड, माने शाळेजवळील परिसर, इंडियन कॉलनी, महाराष्ट्र कॉलनी, सत्संगरोड, विजयनगर या परिसरात टवाळखोर तरुणांचा दिवसेंदिवस उपद्रव वाढतो आहे. या भागातील शालेय विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांना टवाळखोरांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून महिला छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. काळेवाडी परिसरात पोलीस गस्त वाढवून टवाळखोरांचे उपद्रव थांबवावेत. त्यामुळे महिला सुरक्षित होतील. यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर देखील आळा बसणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणार्या शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर विनाकारण घुटमळणार्या तरुणांना पोलिसांनी वेळोवेळी खडसावले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर आता रोडरोमिओंची गर्दी कमी झाली आहे. मात्र, काळेवाडी परिसरात वसाहतींमध्ये टवाळखोरी वाढली. त्यामुळे आता याचा देखील बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.