पिंपरी : चिखलीतील जमिनीचे कागदपत्रे दाखवून दोघांनी काळेवाडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल 4 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चंद्रशेखर गोकुळ नार्वेकर आणि पवार या दोघांविरुध्द लहानु यशवंत नरोटे (रा. लक्ष्मी तारा अपार्टमेंट, काळेवाडी) या बांधकाम व्यावसायीकाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानू नरोटे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना बांधकामासाठी जागा हवी होती. यावेळी आरोपी नार्वेकर आणि पवार यांनी नरोटे यांना चिखली येथील एका जागेची कागदपत्रे दाखवून 4 लाख 87 हजार रुपये घेतले. मात्र बरेच दिवस उलटून देखील त्यांना जमिनीची खरेदी न करुन दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर लहानू नरोटे यांनी नार्वेकर व पवार या दोघांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.