नातेवाईकाच्या शैक्षणिक कामाची रक्कम एकाने लुबाडली
पिंपरी-चिंचवड : एम. टेक. व बी.बी.ए.च्या प्रवेशासाठी ठेवण्यास दिलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून एकाने महिलेची आठ लाख 17 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिनेश किशनचंद नानकानी (वय 45, रा. नटराज मार्केट, साई चौक, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मुक्ताबाई काळे (वय 40, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी-फिर्यादी ओळखीचे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुक्ताबाई काळे आणि आरोपी दिनेश नानकानी यांची ओळख आहे. फिर्यादी काळे यांनी त्यांच्या एका नातेवाईकाच्या एम. टेक. व बी. बी. ए.च्या प्रवेशासाठी लागणारी आठ लाख 17 हजारांची रक्कम दिनेश याच्याकडे दिली होती. ती रक्कम आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादी महिलेची फसवणूक केली. पिंपरी ठाण्याचे फौजदार मुंढे अधिक तपास करत आहेत.