काळेवाडी-आळंदी ‘बीआरटी’साठी आणखी आठ कोटी खर्चास मंजुरी

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील काळेवाडी फाटा ते आळंदी बीआरटी रस्त्यावरील कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. या मार्गावरील बीआरटी बस थांब्यांची प्रलंबित कामे करण्यासाठी सात कोटी 30 लाख 95 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी बीआरटी रस्ता कित्येक दिवसापासून रखडलेला प्रकल्प आहे. या मार्गावरील बीआरटी बसथांब्याची कामे अद्याप अपूर्ण आहेत. बसथांब्यांची उर्ववित कामे करण्यासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा खर्च पालिका करणार आहे.

10.70 किमी रस्ता
हा काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता 10.70 किलोमीटर लांबीचा बीआरटीएस मार्ग आहे. सांगवी-किवळे बीआरटी मार्ग व देहू-आळंदी रस्ता या दोन प्रमुख रस्त्यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने त्यावरील कामे तातडीने होणे अपेक्षित आहे. या मार्गासाठी तब्बल 257 कोटी रुपये एकूण खर्च केले जाणार आहेत. यापुर्वी पालिकेने सन 2010 पासून वेगवेगळ्या पाच टप्प्यात कामे सुरू झालेली आहेत. मात्र, मागील सात वर्षांपासून या बीआरटी मार्गाचे काम रखडलेले आहे.

11 पैकी 8 बसथांबे कार्यान्वित
काळेवाडी फाट्यापासून काही अंतरापर्यंत, तर इकडे ऑटो क्लस्टरपासून पुढे कुदळवाडीपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. या मार्गावर एकूण 15 बीआरटी बस थांबे आहेत. त्यापैकी 8 बस थांबे उभारण्यात आले आहेत. अन्य बस थांबे नव्याने करावे लागणार आहेत. यापुर्वीच्या बस थांब्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे पालिका स्थापत्य बीआरटी विभागाने या बस थांब्याचे कामासाठी सुमारे 8 कोटी 47 लाख 18 हजार 814 रुपयांची निविदा काढली आहे. त्यामध्ये मे. बी. के. खोसे या ठेकेदाराने 7 कोटी 30 लाख 95 हजार 393 रुपयांमध्ये हे काम करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार बस थांब्याचे काम या ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

18 कोटींच्या विकास कामांना मान्यता
शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणार्‍या सुमारे 18 कोटी 24 लाख 59 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या अ,ब,क,ड,इ व फ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रस्ते/गटर्स साफसफाई करण्यासाठी येणा-या सुमारे चार कोटी 60 लाख 90 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ’ब’ व ’क’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेण्याच्या कामसाठी येणा-या सुमारे 58 लाख 21 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.