काळ्याचे पांढरे करणार्‍या कंपन्यांवर छापे!

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा पांढरा करणार्‍या विविध कंपन्या आता केंद्र सरकारच्या रडारवर आल्या आहेत. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शनिवारी देशभरात छापेसत्र राबवले. तब्बल 16 राज्यांतील 300 कंपन्यांवर ईडीच्या अधिकार्‍यांनी छापे घालून आक्षेपार्ह कागदपत्रे, काही ठिकाणी रोखरक्कम हस्तगत केली. यातील बहुतांश कंपन्या या बनावट असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे काळ्याचा पांढरे करणार्‍या कंपन्यांसह राजकीय नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. हैदराबादस्थित विश्‍वज्योती रीयल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडसह अन्य काही कंपन्यांची तब्बल 3.04 कोटी रुपयांची संपत्तीही यावेळी जप्त करण्यात आली. छापे टाकण्यात आलेल्या कंपन्यांवर प्रिव्हेंशन ऑफ मनिलाँड्रिंग, फेमा कायद्याखाली गुन्हे दाखल केले जात असून, नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी या बोगस कंपन्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. या कंपन्यांनी काळा पैसा विदेशातही पाठविल्याचे स्पष्ट झाले असून, आणखी काही कंपन्यांवर रात्री उशिरापर्यंत छापे टाकण्याचे नियोजन ईडीने केले होते. या कंपन्यांत मुंबईतील काही कंपन्यांचादेखील समावेश आहे. तसेच, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील काही कंपन्याही रडारवर होत्या.

8 हजार कोटींच्या काळ्या पैशाचे गौडबंगाल
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राजधानी दिल्ली, पाटणा, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदिगड, कोलकाता, चेन्नई, कोच्चीसह तब्बल 16 राज्यांतील 300 कंपन्यांवर शनिवारी अचानक छापे टाकले. त्यामुळे कंपन्यांत एकच खळबळ उडाली होती. तर या बोगस कंपन्या स्थापन करून काळा पैसा विदेशात पाठविणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. या छाप्यात संशयास्पद कागदपत्रे, मोठ्या प्रमाणात व्यवहाराचे तपशील आणि काळा पैसा पांढरा केल्याचे पुरावे आणि रोख रक्कमही मिळाली असल्याचे ईडीच्या सूत्राने सांगितले. छापेमारीत जवळपास शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेच्या देवाणघेवाणीचा तपशील हाती आल्याची माहितीही सूत्राने दिली. छाप्यांमुळे राजकीय नेतेदेखील हादरले असून, ईडीने गत महिन्यात मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यांतर्गत काही प्रकरणांचा भंडाफोड केला होता. त्याद्वारे दिल्लीतील एका फर्मची 64.70 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. याप्रकरणाचा तपास केला असता तब्बल 8 हजार कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचे गौडबंगाल चव्हाट्यावर आलेले आहे.

काळा पैशावाल्यांना सोडणार नाही : कर्नल सिंह
काळा पैसा घोषित करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 31 मार्चपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपताच शनिवारी ईडीने देशभरात कारवाई सुरू केली. नोटबंदीमुळे पैसा गुंतवण्याच्या नावाखाली अनेक बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्या आणि या कंपन्यांमार्फत परदेशात मोठ्या प्रमाणात पैसा पाठवला गेला, असा ईडीला संशय आहे. ईडीने आतापर्यंत 16 राज्यात 100 ठिकाणांवर छापे टाकल्याचे समोर आले. ईडीचे शेकडो अधिकारी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, चंदिगड, पाटणा, हैदराबाद, चेन्नई आणि कोच्चीसह इतर ठिकाणांवर छापे टाकत होते. यातून शेकडो कोटींच्या व्यवहारांचा तपशील ईडीला मिळाला आहे. या कारवाईतून अनेकाची पोलखोल होण्याची शक्यता आहे. ’काळ्या पैशाच्या खेळात जे कोणी सामील असतील त्यांना आम्ही सोडणार नाही’, असे ईडीचे संचालक कर्नल सिंह यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

शेल कंपन्यांच्या 100 कार्यालयांवर छापे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीच्या अधिकार्‍यांचा नुकताच स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) गठीत केला होता. या पथकाने नुकतेच काही शेल कंपन्यांवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. या कंपन्यांत गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा झाला असून, या कंपन्यांच्या व्यवहाराची कसून तपासणी केली जात आहे. तसेच, दोषी आढळणार्‍या कंपन्यांवर मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट, फेमा अ‍ॅक्ट, तसेच बेकायदेशीर विदेशी व्यवहार कायद्यांतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. शनिवारी तब्बल 100 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. आणखी काही दिवस हे छापेसत्र सुरुच राहील, असे सांगून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी काळ्या पैशाप्रकरणी अत्यंत गंभीर असल्याची माहितीही ईडीच्या सूत्राने दिली.