काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू मनसे कार्यकर्त्यांनी पकडला!

0

मनोर । पालघर रेशनिंगचा खर्‍या लाभधारकांना लाभ मिळत नसून, त्यांच्या तोंडचे अन्न काळ्या बाजारात नेऊन विक्री केली जात असल्याचे प्रकार पालघरमध्ये सर्रास घडत आहेत. अशाचप्रकारे दातिवरे येथे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू मनसे सैनिकांनी रंगेहात पकडल्यामुळे रेशन माफीयांमध्ये खळबळ उडालेली आहे. दातिवरे येथील माता रमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री मोहन वर्तक यांच्या रेशनिंग दुकानातील 11 किंवट्ल (22 गोणी) गहू टेम्पोमधून काळाबाजारात विक्री करण्यास नेत होते. दरम्यान दातिवरे येथे मनसेचे पालघर तालुका उपाध्यक्ष चेतन वैद्य, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, केळवा विभाग अध्यक्ष संदीप किणी, उपविभाग अध्यक्ष सचिन किणी, केळवा शाखा अध्यक्ष हर्षल पाटील, पालघर विभाग अध्यक्ष हेमंत घोडके, केळवारोड शाखा अध्यक्ष सचिन भोईर, उप शाखा अध्यक्ष वैभव वसईकर, शिवसेना सरपंच ज्योती तामोरे आणि मनसे उपसरपंच विजया राऊत, ग्रामपंचायत सदस्य (भाजप)गौतम वर्तक, ग्रामपंचायत सदस्य (राष्ट्रवादी काँग्रेस ) रवींद्र भोईर, तसेच संदीप म्हात्रे, पंकज पाटील, प्रशांत ठाकूर, परेश भोईर, ग्रामस्थ आणि मनसे सैनिकांनी रंगेहात पकडून सदरचा माल गाडीसह केळवा सागरी पोलीस ठाणे येथे जमा केला.

दुकानाचा परवाना रद्द करा
या कारवाईत गाडीसह एकूण 26499 रूपये कीमतीचा माल पकडला असून, महसूल प्रशासनाने केलेल्या या कारवाईत गाडी तसेच माता रमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री मोहन वर्तक आणि माता रमाई महिला बचत गटाच्या सचिव रिया रूपेश राऊत यांना अटक करुन या आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे. निकृष्ट प्रतीचा माल ग्राहकांच्या माथी मारणे, माल न देताच तो दिल्याची कागदोपत्री नोंद करणे, रॉकेल आणि धान्य काळ्या बाजारात विकणे अशा प्रकारे रेशनिंगच्या दुकानांतून गैर कारभार चालतो हे महसुल प्रशासनाला चांगले माहीत असल्याचा स्पष्ट आरोप मनसेचे पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांनी केला आहे. कारण सार्वजनिक वितरण व्यवस्था राबविणारी यंत्रणा जुनी आणि मुरलेली‘ असल्याने चोख व्यवहाराची हमी यांच्याकडून कशी बाळगायची असा जाहीर प्रश्‍न राऊत यांनी विचारुन, या भ्रष्ट रेशनिंग दुकानदाराचा परवाना रद्द करण्या बाबत तालुका पुरवठा अधिकारी तडवी यांच्या कडे मागणी केली आहे.