काळ्या यादीतील कंत्राटदाराला कंत्राट देण्याची धडपड सुरूच

0

मुंबई । रेल्वेने काळ्या यादीत टाकलेल्या ’मे. लँडमार्क’ या कंत्राटदारालाच रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचे कंत्राट देण्याची घाई पालिका प्रशासन का करत आहे, असा सवाल पालिकेतील भाजपच्या सदस्यांनी केला. कचरा उचलण्याच्या कामातही ’तोच’ कंत्राटदार आहे, असा आरोपही त्यांनी केला. रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांची कंत्राटे कमी दराची असताना या कंत्राटदाराने जास्त दराची निविदा भरली असूनही त्यालाच या कामांचे कंत्राट देण्यासाठी पालिका प्रशासन मेहेरबान का झाले आहे, अशीही विचारणा भाजपने केली.

महापालिकेच्या बी, ई, एफ-दक्षिण आणि एफ-उत्तर या वॉर्डांमध्ये विविध छोट्या रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण व सुधारणा करण्याच्या कामांसाठी द्यावयाचा कंत्राटाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात आला असता भाजपचे अभिजित सामंत यांनी, रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कंत्राटाची निविदा ’लँडमार्क’ने 11 टक्के जादा दराने भरली असताना पालिकेने ’वाटाघाटी’ करून कमी केल्यानंतर ती 8.50 टक्के दराने भरण्यात आली आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीची कंत्राटे जादा दराने भरली जात असताना ’लँडमार्क’ने ’अबोव्ह’ का भरली आहेत, असा सवाल सामंत यांनी केला.

सत्ताधार्‍यांवर दोषारोप
भाजपचे गटनेते मनोज कोटक आणि प्रभाकर शिंदे यांनीही सामंत यांना पाठिंबा दिला. रेल्वेने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला कोणाचे आशीर्वाद आहेत, त्याला विशेष वागणूक का दिली जात आहे, असे प्रश्‍न कोटक व शिंदे यांनी मांडले, तर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हे कंत्राट अंतिम करताना ’वाटा’ कोणी खाल्ला, याचा खुलासा करा, अशी मागणी केली. या महापालिका वर्तुळात सत्ताधार्‍यांच्या विरोधात नाराजीचा सूर दिसत होता.