जळगाव । भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीस्वाराने रस्त्यावर वळण घेण्याच्या तयारीत समोरुन येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात रेखा रमेश मुजुमदार (वय 62 रा.मु.जे.महाविद्यालयाच्या पाठीमागे, जळगाव) या गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी काव्यरत्नावली चौकात घडली. जखमी मुजूमदार यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेखा मुजूमदार या महाबळ कॉलनीतून दुचाकीने (क्र.एम.एच.19 ए.व्ही.1876) घराकडे येत असताना आरटीओ कार्यालयातून येणार्या दुचाकीस्वाराने काव्यरत्नावली चौकात वळण घेत असताना मुजूमदार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्या रस्त्यावर कोसळल्या. नाकाला व तोंडाला दुखापत झाली तर कानातून रक्त यायला लागले. हा प्रकार पाहिल्यानंतर तेथे जमलेल्या लोकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, धडक देणार्या दुचाकीस्वाराला रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.