पुणे । संगीत नाटक करत असल्यामुळे गाण्यासाठी काव्य रचनांचा शोध घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि त्याला अनुरुप स्वर असतील ते प्रभावीपणे मांडणे हे आमचे काम आहे. त्यामुळे काव्याशी आमचा संबंध हा व्यवसयानेही येतो. काव्याच्या संस्कारांमुळे संगीत नाटकात योगदान देऊ शकले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले.
शिलेदार यांचा विशेष सत्कार
रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे मल्हार धून या कवीसंमेलनाचे रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगीत नाटक क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कारला उत्तर देताना शिलेदार बोलत होत्या. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर मैथिली आडकर, दिप्ती भोगले आणि मीरा शिंदे उपस्थित होत्या.
लहानपणापासूनच कवितेचे संस्कार
चिं. त्र्यं. खानोलकर, रा. ना. पवार, गंगाधर महांबरे यांसारख्या मातब्बर कवींच्या सान्निध्यामुळे काव्याची जाणीव समृद्ध झाली. तसेच आमच्या शाळेतील वा. भा. जोशी सरांनी शाळेत केशवसुतांच्या शताब्दिनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यातही मी सहभागी झाले होते. त्यावेळेपासूनच कवितेचे संस्कार आमच्यावर घडत गेले, असे शिलेदार यांनी यावेळी सांगितले. मल्हार महुये गगनी दाटले नामदेवांची ही रचना त्यांनी याप्रसंगी सादर केली.