भुसावळ:- स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत हैद्राबादच्या मे.कार्व्ही लिमिटेड एजन्सीच्या तीन अधिकार्यांकडून सोमवारपासून पाच दिवस शहराच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. गेल्या सर्वेक्षणात देशात शेवटून दुसर्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या शहराला यंदा टॉप 100 मध्ये स्थान मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने देशभरातील चार हजारांवरील शहरांचे स्वच्छ सर्वेक्षणाचे नियोजन सुरु केले आहे. शहराच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी या एजन्सीच तिन प्रतिनिधींची टिम सोमवारी शहरात दाखल होणार आहे. तीन टप्प्यात या टिमकडून शहराचे सर्वेक्षण केले जाईल. पाच किंवा सहा दिवसांपैकी दोन दिवस शहरातील नागरिकांकडून स्वच्छतेचा फिडबॅक घेतला जाईल तर उर्वरीत चार ते पाच दिवस पालिकेने केलेल्या उपाययोजनांची कागदोपत्री तपासणी केली जाणार आहे.
पालिकेने केल्या उपाययोजना
शहरात स्वच्छतेच्या बाबतीत पालिकेने गेल्या वर्षभराच्या काळात अनेक उपाययोजना केल्या आहेत. यात प्रामुख्याने शहरात घंटागाड्यांच्या माध्यमातून घर ते घर कचरा संकलन, शहरातील प्रत्येक 100 मीटरवर कचराकुंडी, व्यवसायीक भागात दिवसातून दोनवेळा कचरा संकलन व स्वच्छता यासह व्यावसायीकांना कचर्यातून कंपोस्टींग खत तयार करणे, स्वच्छतेच्या अॅपचा वापर वाढविणे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.