चिमुकल्याला सोडून मातेचे नेपानगरात पलायन ; लोहमार्ग पोलिसात नोंद
भुसावळ- अप 15018 गोरखपूर-एलटीटी काशी एक्स्प्रेसमध्ये अडीच महिन्यांचे पुरूष जातीचे बाळ आढळले असून या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मुंबईकडे निघालेल्या काशी एक्स्प्रेसमध्ये बेवारस बाळ रडत असल्याची बाब प्रवाशांना कळाल्यानंतर त्यांनी भुसावळ लोहमार्ग पोलिसांना कल्पना दिली. भुसावळ रेल्वे स्थानकावर दुपारी काशी एक्स्प्रेस आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी प्रत्येक डब्यात जावून बाळ हरवल्याबाबत विचारणा केली मात्र कुणीही प्रतिसाद न दिल्याने लोहमार्ग पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेतले.
नेपानगर स्थानकावर उतरली माता
काशी एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणी डबा (क्रमांक एनई 98560) मधून जितेंद्र ओमप्रकाश शर्मा (खिडकीया, जि.हरदा) व राहुल अनिल दुबे हे प्रवास प्रवास करीत असताना नेपानगर स्थानकावर पाणी घेण्याच्या निमित्ताने एक महिला उतरली मात्र ती डब्यात परत चढलीच नाही तर गाडी सुरू झाल्यानंतर बाळाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर प्रवाशांनी जावून पाहिल्यानंतर तेथे अडीच महिन्यांचे बाळ रडत असल्याने भुसावळ रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांना कल्पना देण्यात आली. भुसावळात रेल्वे आल्यानंतर प्रवाशांना अनोळखी बालकाबाबत विचारणा करण्यात आली मात्र कुणीही प्रतिसाद न दिल्याने आरपीएफ उपनिरीक्षक शरद उईके यांच्या माहितीनुसार लोहमार्ग पोलिसांनी बालक सापडल्याबाबत नोंद घेतली तसेच याबाबत जळगावातील समतोल प्रकल्पाच्या सपना श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्यासह प्रदीप पाटील व सहकार्यांनी सोमवारी दुपारी बाळाचा ताबा घेतला. या बालकाची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.