रावेर : धिम्यागतीने धावणार्या काशी एक्स्प्रेसमध्ये चढतांना पाय घसरुन पडल्याने मध्यप्रदेशातील एक तरुण व तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांनी संतप्त होत काशी एक्सप्रेस रोखून धरली होती.
धावपळ जिवावर बेतली
मुंबईकडे जाणारी काशी एक्स्पे्रस उशिराने धावत होती. एका सुपरफास्ट गाडीला पुढे काढण्यासाठी काशी एक्स्प्रेसला रावेर स्टेशनवर लुप लाईनला (साईडला) उभे केले होते. त्यानंतर 1.11 च्या सुमारास काशी एक्स्प्रेसला हिरवा सिग्नल मिळाला काशी एक्स्प्रेस भुसावळकडे हळूहळू निघाली होती धिम्या गतीने सुरु असलेल्या या गाडीतून थांबवून ठेवलेल्या वेळेत उतरलेले प्रवाशी चढत होते.
दोघांचेही पाय घसरले
नेपानगर येथील विजय मायाराम पटेल (24) मध्यप्रदेशातील शिवल येथील प्रियंका खजान वासकले (20) हेही काशी एक्स्प्रेसमध्ये चढत असतांना पाय घसरुन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फौजदार संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ .ाप्रमोद जंजाळकर, संजिवनी तारगे हे पुढील तपास करीत आहे.
शेगावचे तिकीट मिळाले
विजय पटेल आणि प्रियंका वासुकले हे शेगाव येथे देवदर्शनासाठी जात होते. मात्र हे दुर्घटना घडल्याने त्यांचे स्वप्न अपुरे राहिले. यांच्याजवळील नेपानगर ते शेगाव असे तिकीट पोलिसांनी जप्त केले आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.