नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील काशी विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) पराभव झाला आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदावर समाजवादी विद्यार्थी संघटनेचा बंडखोर विद्यार्थी नेता राहुल दुबे याने 2365 मते मिळवत विजय मिळवला. राहुलने अभाविपचा वाल्मिकी उपाध्याय याचा पराभव केला. उपाध्यक्षपदावर विजय मिळवणारा रोशनकुमार हा समाजवादी आणि भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा संयुक्त उमेदवार होता. महामंत्रिपदावर अनिल यादवने विजय मिळवला.
त्याने समाजवादी विद्यार्थी संघटनेला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्याशिवाय चौथ्या जागेवर समाजवादी व भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे संयुक्त उमेदवार रवी प्रताप सिंह याने विजय मिळवला. निवडणुकीत अभाविपला एकही जागा मिळवता आली नाही. यापूर्वी अलाहाबाद विद्यापीठ, जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठातही अभाविपला पराभवाचा सामना करावा लागला होता. विद्यार्थ्यांमध्ये अभाविपचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसून येते.