काश्मिरातील ‘5 टक्क्यांचा’ निकाल लावाच!

0

गेल्या सप्ताहात काश्मीर खोर्‍यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांवर भारतीय लष्करी जवान कारवाई करीत असताना, काश्मिरातील स्थानिक तरुणांनी अडथळे निर्माण करून लष्करावर दगडफेक केली. या संधीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी लष्करी जवानांवर बेछूट गोळीबार केला ज्यात मेजरसह तीन जवान शहीद झाले. 8 जुलै 2016 भारतीय सुरक्षा दलांनी बुर्‍हाण वानी या काश्मिरी कट्टरवादी दहशतवाद्यास ठार मारल्यानंतर काश्मीर खोर्‍यातील स्थानिक जनतेने लष्करावर दगडफेक करत दहशतवाद्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली दिसून येतेय.

पाकिस्ताननिर्मित फुटीरवादी दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी एकत्रित उघडलेल्या मोहिमेला खोडा घालण्याचे काम फुटीरवादाला प्रोत्साहन देणारी 5 टक्के काश्मीर खोर्‍यातील जनता सातत्याने करीत आहे. मंगळवारी झालेल्या दहशतवाद्यांच्या कारवाईच्या वेळी पुन्हा एकदा याच 5 टक्के काश्मिरी तरुणांनी लष्करालाच निशाणा बनवल्याने लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा संयम सुटला आणि त्यांनी धडा शिकवण्याचा इशारा दिला.

भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी फुटीरवादी काश्मीरीयत जोपासणार्‍या घटकांना इशारा देताना म्हटलेय की, दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू असताना अडथळे निर्माण करणार्‍या व पाकिस्तान आणि ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकवणार्‍यांना देशविरोधी समजण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. लष्करप्रमुखांनी दिल्लीहून दिलेला हा इशारा बोलण्यापुरता न राहता कृतीत दिसायला हवा, तरच 1947 पासून काश्मीर खोर्‍यातील 5 टक्के जनतेला वेगळेपणाचे पडलेले स्वप्न हा भ्रम आहे, याची प्रचिती येईल. नाहीतर पुन्हा ‘आम्हाला फक्त स्वातंत्र्य हवे. कारण आम्ही भारताचे घटक नाही. अशाच फुटीरतेच्या घोषणा काश्मीर खोर्‍यात दुमदुमत राहतील!

भारतीय संघ राज्याचा भाग असलेले जम्मू-काश्मीर हे राज्य जम्मू, काश्मीर खोरे आणि लडाख या तीन विभागांत विस्तारलेले आहे. जम्मू आणि लडाख या दोन विभागांतील जनतेने, आपण भारतीय आहोत. या अस्मितेचा स्वीकार केलेला आहे. समस्या आहे ती काश्मीर खोर्‍यातील बहुसंख्याक असलेल्या मुस्लीमधर्मीय समूहांची. भारतीय संघराज्यातून मिळणारे सारे फायदे उपटायचे आणि साळसूदपणाचा आव आणत स्वतःची ‘काश्मीरियत’ स्वतंत्रता कुरवाळत आपण म्हणजे वेगळे राष्ट्र आहोत, असा अहंगडही जोपासयाचा, अशी दुहेरी नीती काश्मीर खोर्‍यातील राज्यकर्त्यांनी व जनतेने 1947 पासून ठेवलेली आहे.

भारत स्वतंत्र होत असतानाच जम्मू-काश्मीर संस्थानचे महाराजा हरिसिंह आणि काश्मीर खोर्‍यातील लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीरचे स्वतंत्र राष्ट्र बनवायचे होते. त्यामुळे त्यांनी भारत व पाकिस्तान यापैकी कोणत्याही देशात जम्मू-काश्मीर संस्थान विलीन न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी पठाणी टोळ्या आणि पाकिस्तान सैन्याने काश्मीरवर आक्रमण केले त्यावेळी महाराजा हरिसिंह यांनी 26 ऑक्टोबर 1947 ला जम्मू-काश्मीरचे विलीनीकरण भारतात केले. राजा हरिसिंह व शेख अब्दुल्ला यांच्या दिरंगाईमुळे काश्मीर खोर्‍यात भारतीय लष्कर येईपर्यंत पाकिस्तानी सैनिकांनी जिंकलेला भाग पाकिस्तानने आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. ज्याला आपण आज पाकव्याप्त काश्मीर म्हणतोय. तेथूनच होणारी घुसखोरी काश्मीर खोर्‍यात धार्मिक स्वतंत्रवादीवृत्तीला खतपाणी घालतेय.
1947 ला भारतात सामील होताना झालेल्या करारानुसार जम्मू-काश्मीर राज्यास भारतीय राज्यघटनेच्या 370व्या कलमानुसार एक तात्पुरता विशेष दर्जा देण्यात आला होता. त्यानुसार संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे अधिकार केंद्राकडे राहतील. बाकी सर्व स्वायत्तता व स्वतःची वेगळी घटना समिती ठेवण्यास मान्यता देण्यात आली. 1956 मध्ये जम्मू-काश्मीरच्या घटना- समितीने भारतातील सामीलीकरणास मान्यता दिली.

तेव्हाच जम्मू-काश्मीरच्या स्वतंत्र मागणीचा विषय संपला होता. पण काश्मीर खोर्‍यातील मुस्लीम बहुसंख्याकता आणि पाकिस्तानची भौगोलिक सलगता या बाबीचा फायदा घेत शेख अब्दुलांनी काश्मीरला संपूर्ण स्वायत्तता हवी, असा नारा देत स्वतंत्र काश्मीरचा झेंडा रोवला. कालांतराने सत्तेवर येताच शेख अब्दुलांनी सौम्य भूमिका घेतली. तरीही त्यांनी मांडलेल्या स्वतंत्र वेगळेपणाच्या विचारांवरच 1980 नंतरचा काश्मिरी फुटीर दहशतवाद उभा राहिला आणि काश्मीर खोर्‍यात फोफावत गेला.
भारताच्या केंद्र सरकारने सत्तर वर्षात जम्मू-काश्मीर अब्जो रुपये खर्च केले. हजारो जवान मारले गेले, तरीही काश्मीर खोर्‍यातील जनता भारताला आपलं मानायला तयार नाही. आज हा भाग आपल्याकडे आहे तो फक्त लष्कराच्या बळावर असेच जग मानतेय. 1 कोटी 25 लाख लोकसंख्या असलेल्या या राज्यात काश्मीर खोर्‍यातील 5 टक्केच जनता फुटीरवादी दहशतवादाचे समर्थन करते असे मानले जाते. म्हणूनच लष्करप्रमुखांनी या 5 टक्केवाल्यांचा कायमचा निकाल लावून त्यांना ठेचायला हवे, तर हे राज्य कायमचे फुटीरवादी मनोवृत्तीतून बाहेर पडू शकेल.

जम्मू काश्मिरातील हिंसाचार, तेथे वर्षेनुवर्षे पाकिस्तानप्रणित दहशतवाद्यांनी मांडलेला उच्छाद हे सारे भारतासाठी नेहमीच धोकादायक आणि आव्हानात्मक ठरले आहे. त्यातही भारतीय सैनिकांनाही सातत्याने त्रास देण्याचाी पाकची मानसिकता म्हणजे विकृतीला भाग म्हणावा लागेल. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या उरी हल्ल्याचा बदला भारताने सर्जिकल स्ट्राईकद्वारे चोख उत्तर दिले. हे उत्तमच. मात्र तरीही आणि त्यानंतरही प्रवृत्तीत काही चांगला फरक पडेल तो पाक कसला? अशी स्थिती आहे. त्यामुळे जम्मू काश्मिरातील अशांतता ही भारतासाठी डोकेदुखी असून फुटीरवादाचे समर्थन करणारे किती यापेक्षा त्यांचा कायमचा निकाल लावणेच अनेकपरिने हितकारक ठरेल आणि अशांततेवर मार्ग निघल्यासारखे वाटेल.

– विजय य. सामंत
9819960303