श्रीनगर : पाकिस्तानमधील न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच काश्मीरमधील एका नेत्याने या फाशीचे समर्थन केले आहे. पाकिस्तानने फक्त कायद्याचे पालन केले असे सांगत या नेत्याने पाकचे समर्थन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते मुस्तफा कमाल यांनी थेट पाकिस्तानचे समर्थन करत नवा वाद निर्माण केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कमाल यांनी हे विधान केले. कमाल म्हणाले, पाकिस्तानने फक्त नियमाचे पालन केले आहे. सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या भारताने यावर शंका उपस्थित करणे योग्य नाही असे त्यांनी म्हटले आहे.
कमाल यांच्या विधानावर नॅशनल कॉन्फरन्सकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कमाल यांचे विधान ही पक्षाची भूमिका आहे का असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेविषयी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसूरी यांना पत्रकारांनी कुलभूषण जाधव यांच्याविषयी प्रश्न विचारला. पण यावर उत्तर न देताच कसूरी यांनी तिथून काढता पाय घेतला.