काश्मिरी विभाजनवाद्यांना समर्थनाची पाकची दर्पोक्ती

0

नवी दिल्ली । अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून ही घोषणा करण्यात आली होती. मात्र, पाकिस्तानने सय्यद सलाऊद्दीनची पाठराखण करत अमेरिकेचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे. सलाऊद्दीन काश्मीरी जनतेच्या हक्कांसाठी लढत असल्याचा जावईशोधही पाकिस्तानकडून लावण्यात आला आहे. अशा लोकांना दहशतवादी घोषित करणे अयोग्य आहे. आम्ही भविष्यात काश्मीरमधील विभाजनवाद्यांना राजकीय आणि नैतिक पातळ्यांवर पाठिंबा देऊ, अशी दर्पोक्ती पाकने केली आहे.

स्वयंनिर्णयाच्या हक्काचा सोयीचा बहाणा
काश्मीरी जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्क मिळावा आणि संयुक्त राष्ट्रांनी आखून दिलेल्या ठरावानुसार काश्मीर वादावर तोडगा निघावा, यासाठी आम्ही हा पाठिंबा देत असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले. सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा अमेरिकेचा निर्णय भारताच्या दहशतवादविरोधी रणनीतीच्यादृष्टीने यश मिळाल्याचे मानले जाते आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भेटीनंतर इराणनेही नाराजी व्यक्त केली आहे. इराणने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करुन जगभरातील मुस्लिमांनी बहारिन, काश्मीर आणि येमेनमधील जनतेला अत्याचारी हुकूमशहांविरोधात साथ द्यावी असे आवाहन अयातोल्ला खोमेनी यांनी केले आहे. खोमेनी यांच्या विधानामुळे भारत आणि इराणमधील संबंधांमध्ये कटूता वाढण्याची शक्यता आहे.भारत आणि इराणमधील संबंधांमध्ये काही महिन्यांपासून कच्चा तेलाचा पुरवठा आणि नैसर्गिक वायू साठ्यांवरुन तणाव आहे. यात भर म्हणजे आता खोमेनी काश्मीरचा मुद्दा मांडून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.