पीडीपी आमदार एजाज अहमद मीर यांचे संतापजनक वक्तव्य
श्रीनगर : काश्मीरमधील दहशतवादी हे आपल्या भावांसारखेच आहेत, दहशतवादी हे शहीद होतात, आपण त्यांचा मृत्यू साजरा करायला नको, असे पीडीपी आमदार एजाज अहमद मीर यांनी म्हटले असून, दहशतवाद्यांना शहीदांचा दर्जा दिला आहे. अहमद मीर यांच्या विधानावर भाजपने टीकास्त्र सोडले आहे. जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपीच्या आमदाराच्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे.
मीर यांच्या घरावरही झाला होता हल्ला
काश्मीरमध्ये शहीद होणार्या दहशतवाद्यांपैकी काहीजण अल्पवयीन असून, आपण नेमके काय करतो हेदेखील त्यांना समजत नाही, असे मीर म्हणाले. आपण दहशतवाद्यांचा मृत्यू साजरा करु नये. जवान शहीद झाल्यावर आपण त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो, तशीच सहानुभूती आपण दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांबद्दलही व्यक्त केली पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य मीर यांनी केले आहे. त्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. विशेष म्हणजे, तीन महिन्यांपूर्वी मीर यांच्या घरावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. मीर आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य घरात नसल्याने बचावले होते.
काश्मीरच्या विकासाचे, शांततेचे शत्रू
पीडीपी आमदार एजाज अहमद यांच्या विधानावर भाजपनेही टीका केली. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मीर यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, फुटिरतावादी आणि दहशतवादी हे काश्मीरचे, काश्मीरच्या विकासाचे आणि शांततेचे शत्रू आहेत. मग ते एखाद्याचे भाऊ कसे होऊ शकतात, असा प्रश्न त्यांनी विचारला. मीर हे काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील वाछी मतदारसंघातून निवडून येतात. बुधवारी मीर यांनी जम्मू -काश्मीरमधील दहशतवाद्यांवरुन राजकारण करु नये, असे आवाहन केले होते. हिंसाचार संपवण्यासाठी उपाययोजना राबवण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले होते. भाजपचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री सुनील शर्मा यांनीदेखील मीर यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. आमदाराने दहशतवाद्यांना शहीदाचा दर्जा देणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. आमदार रविंदर राणा म्हणाले, मी याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असून, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही त्यांच्या आमदारांला असे वादग्रस्त विधान करु नये अशी समज द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.