काश्मीरच्या पर्यटनाला प्रोत्साहन देतोय जाँटी ऱ्होडस

0

श्रीनगर: एकेकाळी मैदानावर आपल्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या बळावर अचंबित करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होडस सध्या काश्मीरमध्ये आपले दिवस घालवीत आहे. तो सध्या काश्मीरच्या सौंदर्याने भारावला असून पर्यटकांनी काश्मीरला जरूर भेट द्यावी यासाठी राज्य पर्यटन विभागाच्या प्रमोशन व्हिडीओत तो झळकला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने एकही पैसा घेतलेला नाही.

या व्हिडीओत जाँटी पृथ्वीवरच्या या स्वर्गात या, अत्युल घाटीचा अनुभव घ्या, येथील पाहुणचार घ्या असे सांगतो आहे. ७२ सेकंदाचा हा व्हिडीओ गुलमर्ग येथील बर्फाच्छादित डोंगररांगात घेतला गेला आहे. जाँटी येथील बर्फाच्छादित शिखरांकडे हात दाखविताना त्याची ही तिसरी काश्मीर फेरी असल्याचेही सांगतो. स्कि बोर्ड आपण येथेच शिकलो असे तो सांगतो. गेल्या आठवड्यात स्नो रग्बी स्पर्धा येथे पार पडली व ती पाहण्यासाठी जाँटी आला होता त्यावेळी काश्मीर पर्यटन मंडळाने त्याला काश्मीर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली व क्षणाचाही विलंब न लावता जाँटीने ती मान्य केली असे समजते.