काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यास अपयश

0

चेन्नई : काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यास मोदी सरकार अपयशी ठरले आहे. एकेकाळी देशाची ताकद असलेले जम्मू काश्मीर आता देशाची कमकुवत बाजू झाले आहे, अशी टीका काँग्रेस उपाध्याक्ष राहुल गांधी यांनी चेन्नई येथे केली. डीएमके अध्यक्ष करुणानिधी यांच्या 94 व्या वाढदिवसानिमित्त ते येथे आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी बोलताना काश्मीर मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला.

काश्मीरचा वापर राजकारणासाठी
राहुल गांधी म्हणाले, काही महिन्यांपूर्वी मला संरक्षण मंत्री अरुण जेटली भेटले होते. त्यावेळी मी त्यांना जम्मू काश्मीरमधील परिस्थितीसंदर्भात सावधानतेचा इशारा दिला होता. केंद्र सरकारने काश्मीरला संकटात ढकलले आहे. काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे मी जेटलींना म्हणालो होतो. पण जेटलींनी काश्मीरमध्ये शांतता असल्याचा दावा केला. मोदी सरकार त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे देशात समस्या निर्माण करत असून काश्मीरचा वापर फक्त राजकारणासाठी होत आहे. काश्मीर हे राज्य एकेकाळी भारताची ताकद होती. पण आता हे राज्य भारताची कमकुवत बाजू झाली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

विचार लादू देणार नाही
काँग्रेस आणि समान विचारधारा असलेले पक्ष संघ आणि मोदी यांना त्यांचे विचार देशावर लादू देणार नाही. एक अब्जपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील जनतेच्या आवाजाची गळचेपी होऊ देणार नाही, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केले. या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, कम्यूनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचूरी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन आदी उपस्थित होती. डीएमके अध्यक्ष करुणानिधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांची एकजूटही दिसून आली.