काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात चार दहशतवाद्यांचा खात्मा

0

जम्मूच्या सांबा जिल्ह्यातून दारूगोळा व शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कर व स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

लष्कराला पुलवामामधील राजपोरा गावात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून ४४ राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल व जम्मू-काश्मीरच्या विशेष कृती दलानं राजपोरा गावाला वेढा दिला. शनिवारी पहाटे हाजीपाइन भागातील एका घरातून दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. गोळीबार करून पळण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत घराबाहेर पडू दिलं नाही. या कारवाईच्या वेळी संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा खंडित केली. तसंच, सीआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्यामुळे दहशतवाद्यांची कोंडी झाली. अनेक तास चाललेल्या या कारवाईत चार दहशतवादी मारले गेले.

सांबा जिल्ह्यातून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

काश्मीरमधील या कारवाईच्या आधी लष्करानं जम्मूच्या सांबा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दारूगोळा व शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला. त्यात एके ४७ रायफलींचा समावेश आहे. ही शस्त्रास्त्रं दहशतवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवली होती, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.