काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन जवानांसह एक अधिकारी शहीद

0

बारामुल्ला: काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पेट्रोलिंग पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात केंद्रीय राखीव पोलीस बलातील (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) शहीद झाले आहेत. आज सोमवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडली.

यावेळी झालेल्या गोळीबारात काही सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामुल्लातील क्रिरी भागात ही घटना घडली. हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवर दहशतवाद्यांनी केलेला हा गेल्या तीन दिवसातील दुसरा हल्ला आहे. १४ ऑगस्टला श्रीनगरमधील नवगाम भागात दोन पोलीस दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. तर एकजण जखमी झाला होता.