काश्मीरमध्ये पूर आणि बर्फवृष्टी, 4 जणांचा मृत्यू

0

श्रीनगर । काश्मीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तसेच काही मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पावसामुळे श्रीनगरच्या अनेक भागांत पाणी साचल्यामुळे तिथे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे, तर बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात पाच जवान अडकले आहेत. यापैकी दोघांना काढण्यात यश आलेे, तर गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. एक जवान बेपत्ता आहे.

श्रीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी आणि भूस्खलन होत आहे. पूर आणि भूस्खलनामुळे शुक्रवारी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता तसेच रविवारपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात अशा प्रकारे बर्फवृष्टी फार कमी होत असते. मात्र, आता एप्रिल महिन्यातच पूर आणि बर्फवृष्टी झाली आहे. मुसळधार पावसामुळे झेलम व तिच्या उपनद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने मध्य काश्मीरसह अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झालीये, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात भूस्खलनाचा धोका असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काश्मीरसह विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे काश्मीर विद्यापीठ व इस्लामिक विद्यापीठ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.