श्रीनगर । जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा येथे सोमवारी लष्करी तळावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न फसला. येथील संबळ परिसरात असणार्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) तळावर दहशतवाद्यांनी सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, अशी माहिती सीआरपीएफचे उपनिरीक्षक योगेश कुमार यांनी दिली.
संबळ येथील सीआरपीएफच्या 45 व्या बटालियनचा तळ असणार्या परिसरात पहाटेच्यावेळी दहशतवादी दाखल झाले. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा होता. तळावर दाखल होताच दहशतवाद्यांनी पहार्यासाठी उभारण्यात आलेल्या चौकीवर गोळीबार केला. मात्र, याठिकाणी असणार्या भारतीय जवानांनी या हल्ल्यातून लगेच सावरत जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये चार दहशतवादी ठार मारले गेले. त्यांच्याजवळ चार एके रायफल्स, युबीजीएल (अंडरबॅरल ग्रेनेड लाँचर) आणि आणखी काही शस्त्रे सापडली.
काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी तयार असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या नव्या बॅचचा
काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्याने रामपूर, त्राल आणि उरी सेक्टरमध्ये हल्ल्याचा कट उधळून लावला होता. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवरील तणाव प्रचंड वाढला आहे. काही दिवसांपूर्वी पुंछ सेक्टरमधील कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानच्या बॅट टीमने घुसखोरी करत दोन भारतीय जवानांची हत्या केली होती. यावेळी पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबनाही केली होती.
बॅट म्हणजे काय?
पाकिस्तानकडून बॉर्डर अॅक्शन टीमचा वापर नियंत्रण रेषेजवळ छापे टाकण्यासाठी केला जातो. पाकिस्तानी सैन्याचा स्पेशल सर्व्हिस ग्रुप बॅटचा प्रमुख हिस्सा आहे. लपूनछपून छापे टाकणे आणि कोणत्याही मार्गांचा अवलंब करून भारतीय सैन्याच्या वरचढ कारवाया करणे, ही जबाबदारी बॅटकडे असते. बॅटमध्ये पाकिस्तानी सैन्याबरोबरच दहशतवाद्यांचाही समावेश असतो. इअढ ने यापूर्वी अनेकदा भारतीय जवानांचा शिरच्छेद करून त्यांच्या मृतदेहांची विटंबना केली आहे.