काश्मीरमध्ये सैन्यानी केले सहा दहशतवादी ठार

0

जम्मू- काश्मीर : काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग जिल्ह्यामधील बिजबेहरा येथे भारतीय जवानांनी ६ दहशतवाद्यांना ठार केलं आहे. या भागात अजूनही काही दहशतवादी लपले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पहाटेपासूनच भारतीय सैन्याचं सर्च ऑपरेशन सुरू आहे.

श्रीनगरहून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या अनंतनागमध्ये हे दहशतवादी लपून बसले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी बिजबेहराला भारतीय सैन्याने घेरले. त्यानंतर दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले. या परिसरात अजूनही काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

लष्कराच्या कुलगाम छावणीवर गुरुवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात कुलगाममधील एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. मंगळवारीदेखील हिजबूल मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केलं होतं.