बीजिंग । पाकिस्तानमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या गुंतवणुकीचे संरक्षण होण्यात त्याचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे चीन काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याचा विचार करीत आहे, असे वृत्त चिनी वृत्तपत्रांनी मंगळवारी दिले होते. तथापि, चीनने आता याचा इन्कार केला आहे. काश्मीर प्रश्नासंबंधात चीनच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नसून मध्यस्थी करण्याचा प्रश्न येत नाही, असे चीनच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भारत आणि पाकिस्तान एकमेकांमधील समस्या योग्य प्रकारे हाताळतील, असा विश्वास चीनला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नात मध्यस्थी न करता दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याला चीन प्राधान्य देत आहे. मध्यस्थी करून प्रश्न सुटणार नाही. मात्र, दोन्ही देशांनी चर्चा केल्यास मार्ग निघू शकतो, असे चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी स्पष्ट केले.
मात्र, चीनने नेहमी पाकिस्तानच्या पदरात झुकते माप टाकले आहे. त्यामुळे मधस्थीस नकार हा त्याचा केवळ राजकीय डावपेच असू शकतो. भारताने त्यावर विशेष विश्वास न टाकता आपली तयारी करणे आवश्यक आहे, असे मत विदेश तज्ञांनी व्यक्त केले आहे. चीन जे बोलतो तेच करेल याची कोणतीही खात्री देता येत नाही, असे अनेकदा दिसून आले आहे.